ठाणे : मुंब्रा पुलाची व बायपासच्या रस्त्याची दुरूस्ती १० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी दिली. यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी त्यांनी अभियंत्यांवर तीव्र संताप व्यक्त करून या पुढे विलंब करू नका अशी तंबी पालकमंत्र्यानी यावेळी दिली.कोणत्याही परिस्थितीत ही वेळ पाळली जावी असे सांगून पालकमंत्र्यांनी सर्व पालिका हद्दीतील व ग्रामीण भागातील रस्त्यांचे खड्डे पॉलिमरसारखे तंत्राान, रेडी मिक्स वगैरे सारख्या पद्धतीने तातडीने बुजवावेत, पोलिसांना मदत करण्यासाठी १०० वाहतूक वॉर्डन एमएसआरडीसीने द्यावेत असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी देखील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने सुचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीत मुंब्रा बायपास दुरु स्ती तसेच ठाणे शहर, कल्याण डोंबिवली, भिवंडी परिसरात होणारी वाहतूक कोंडी यावर विस्तृत चर्चा झाली.सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेलचे अभियंता आर एस पाटील यांनी माहिती देतांना सांगितले की, १० सप्टेंबरपर्यंत पूल व बायपासची दुरुस्ती पूर्ण होईल. मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळे मुंब्रा रस्त्यावरील काही भाग खचला त्यामुळे नवी समस्या निर्माण झाली. या रस्त्यालगत राहणा-या काही कुटुंबाना ठाणे पालिकेने तात्पुरती निवास व्यवस्था केली, पण ती कुटुंबे तिथून न गेल्याने दुरु स्तीला उशीर होत असल्याचे पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले. पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी पोलिसांच्या मदतीने कुटुंबे हलविण्याची व्यवस्था करू असे सांगितले. गेमन चौक येथील दुरुस्ती देखील तितकीच महत्वाची असल्यामुळे त्यावर यावेळी चर्चा झाली. यानुसार पालकमंत्र्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिका-यांशी या बैठकीतूनच संवाद साधला असता २५ आॅगस्टपर्यंत ही दुरुस्ती पूर्ण झाली पाहिजे असा सज्जड दम अधिका-यांस दिला आहे.* गोदामांच्या वाहतुकीला नियंत्रण -भिवंडी येथील गोदामांच्या वाहतुकीस नियंत्रणात आणले व त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली तर बराच प्रश्न सुटेल, असे यावेळी जिल्हाधिका-यांनी सांगितले. भिवंडीतील वाहतूक ट्रक्स संघटनांशी बोलून त्या भागातील वाहतूक नियंत्रित करावी तसेच अवजड व जड वाहनांचे वेळापत्रक निश्चित करावे असे प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांनी स्पष्ट केले. उरण - जेएनपीटी तसेच पालघरकडून येणारी वाहने देखील नियंत्रित करण्याच्या सुचना होत्या मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी तसेच संबंधितांशी बोलण्यात येऊन तत्काळ सुचना देण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. टोल नाक्यावरील गर्दीच्या वेळी पिवळ्या रंगाच्या पट्टीचा नियम पाळण्यात येऊन रांगा सोडाव्यात व गर्दी कमी होईल असे पाहावे असेही जिल्हाधिका-यांनी यावेळी सुचित केले.जड - अवजड वाहनांसाठी अतिरिक्त वाहनतळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने पोलीस कार्यवाई करणार असल्याचे यावेळी ठरले. तलासरी- दापचेरी कडून येणारी वाहने मनोरमार्गे सोडता येतील का ते पहावे, प्रादेशिक परिवहन अधिक-यांनी वाहने क्षमतेपेक्षा जादा भरलेली नाहीत ना याची काटेकोर तपासणी करावी अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. पत्री पुलाच्या उंचीचे अडथळे थोडे अधिक उंच करण्यात यावेत जेणे करून हलक्या वाहनातील टेम्पो वगैरे सारखी मध्यम आकाराची वाहने जाऊ शकतील असेही वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सुचना केली.
* नोडल अधिकारी नियुक्ती -जिल्ह्यातील वाहतूक कोंडीबाबत सर्व संबंधित यंत्रणासमवेत समन्वय साधण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे आणि निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील समन्वय अधिकारी राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. वाहतुक कोंडीचे प्रश्न सोडवितांना अडचणी आल्यास या दोघांशी यंत्रणांनी संपर्क साधावा असे ते म्हणाले. प्रवासी संघटना, टेक्सी संघटना, ओला, उबेर यांचा सहभाग असलेली वाहतूक सल्लागार समिती नेमण्याचे ठरविण्यात येईल असेही पालकमंत्र्याचे स्पष्ट केले.* एफएम वाहिनीची मदत घेणार-वाहतूक कोंडीबाबत तक्रारींवर त्वरित प्रतिसाद दिला पाहिजे. तसेच वाहनधारक आणि नागरिकांना वाहतूक कोंडी किंवा रस्ते दुरु स्तीची अद्ययावत माहिती मिळाली पाहिजे अशी सुचना प्रवासी महासंघाचे मिलिंद बल्लाळ यांनी केली. यावर पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी एफएम रेडीओ वाहिनीच्या माध्यमातून ठाणे आयुक्तालयातील वाहतूक नियंत्रण कक्ष हा सातत्याने अशी माहिती पुरवित राहील अशी व्यवस्था करण्याचे मान्य केले.* १०० वाहतूक वॉर्डनवाहतूक कोंडी दूर करण्यासाठी खड्डे बुजवणे महत्वाचे आहे, त्यामुळे सर्व ठिकाणी किमान मध्यरात्रीच्या वेळी पालिकांनी खड्डे बुजविण्याची प्रक्रिया प्राधान्याने करावी असे पालकमंत्र्यांनी सांगितले. सध्या पोलिसाना मदतीसाठी दिलेले वाहतूक वॉर्डन्स अपुरे असून १०० वॉर्डन्स एमएसआरडीसीने द्यावेत असेही ते म्हणाले. वाहतूक कोंडीमुळे जिल्ह्यातील नागरिकांना, वाहनधारकांना मोठा फटका बसत असून सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून या प्रश्नाकडे पाहावे व लोकांची गैरसोय होणार नाही असे पाहण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी केल्या.