- नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेची कर वसुली योग्य रीतीने होत नसल्याने महापालिकेचा आर्थिक डोलारा कमकुवत झाला आहे. प्रशासनाच्या वतीने शहरातील नागरिक कर वेळेवर भरत नसल्याची ओरड नेहमी होत असते. तर मनपाच्या कर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट वृत्तीने कर वसुली होत नसल्याचा आरोप शहरातील कर भरणारे व सुज्ञ नागरिक वेळोवेळी करत आहेत.मनपाची कर वसुली व्यवस्थित होत नसल्याने मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कर वसुली विभागातील सुमारे ९७ हुन अधिक कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन देखील रोखून ठेवले होते. त्यावेळी नागरिक कर भरत नाही किंवा वासुलीसाठीची बिल वेळेवर मिळत नसल्याचा निर्वाळा वसुली कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला होता. मात्र कर वसुली विभागातील भ्रष्ट कारभार सोमवारी समोर आला आहे. त्यामुळे कर वसुली विभागात एकच खळबळ उडाली आहे. घरपट्टी पत्नीच्या नावे करण्यासाठी मनपाच्या प्रभाग समिती पाच मध्ये असलेले प्रभारी लिपिक महेंद्र मोहिते याने एका इसमाकडून २४ हजार रुपयांची लाच मागितली होती . हि लाच स्वीकारतांना मोहिते यास ठाणे लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात अटक केली असून या कारवाईने भिवंडी मनपाच्या कर वसुली विभागातील भ्रष्टाचार उघड झाला असून मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया आता कर वसुली विभागात वाढलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी नेमकी काय उपाय योजना राबवितात याकडे शहर वासीयांचे लक्ष लागले आहे.