कल्याण - कल्याण-शीळ रस्ते विकास कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. या रस्ते कामाची गुणवत्ता नाही. त्यामुळे या कामाच्या गुणवत्ता तपासण्याकरीता स्वखर्चातून थर्ड पार्टी ऑडीट करण्यात येईल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
आमदार पाटील यांनी सांगितले की, कल्याण शीळ रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. एकीकडे रस्ते विकासाचे काम सुरु आहे. तर ज्या ठिकाणी रस्ते विकासाचे काम करण्यात आले आहे. त्याठिकाणी दुरुस्तीचेही काम सुरु आहे. काही ठिकाणी डांबराचे पॅच मारले जात आहेत. कल्याण पत्री पूलापासून शीळर्पयत सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. या कामात तीन वेळा कंत्रटदार बदलला गेला. कामात कुठल्याही प्रकारची गुणवत्ता नाही.
आधीचा डांबरी रस्ता काम सुरु करण्यापूर्वीच खोदून ठेवला जात आहे. अधिकारी वर्ग टक्केवारीसाठी हे सगळे करीत आहे. कामात कुठल्याही प्रकारची गुणवत्ता नाही. या कामात भ्रष्टाचाराचा आरोप होत असताना तो खरा असल्याचे दिसून येत आहे. अधिकारी वर्गासोबत लोकप्रतिनिधींचीही या भ्रष्टाचारात मिलीभगत आहे. या रस्त्यावरील काटईचा टोल नाका बंद करण्यात आला आहे. मात्र हा टोल नाका अद्याप हटविला जात नाही. हा टोल नाका हटविला न गेल्याने त्याठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीस कोण जबाबदार असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे. या रस्ते कामाची पाहणी करण्याची मागणी अधिकारी वर्गाकडे केली आहे. अधिकारी पाहणी दौरा करण्यास टाळाटाळ करीतआहे. वारंवार सांगूनही पाहणी केली जात नाही. त्यांना रस्त्यावर उभे करुन जाब विचारला जाईल. रस्त्यावर उभे केल्यावर गुन्हे दाखल होतात. मात्र, गुन्हे दाखल झाले तरी चालतील अधिकारी वर्गास रस्त्यावर उभे करुन त्यांना जाब विचारणार असा इशारा पाटील यांनी दिला आहे.