डोंबिवली : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांचे सत्र संपता संपत नाही, पण ते भरण्यासाठी कोट्यवधी रुपयांची कंत्राटे काढली जातात. मात्र, एकूण कंत्राटाच्या रकमेपैकी केवळ ३० टक्के रकमेतून खड्डे भरले जातात, तर बाकी ७० टक्के निधीचा भ्रष्टाचार होतो, असा गंभीर आरोप कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शनिवारी केला.गायकवाड म्हणाले की, केडीएमसीत कशातूनही पैसा कमवायचा हाच उद्देश प्रशासन, सत्ताधाऱ्यांचा असतो. खड्डे कधी भरलेच गेले नाहीत. केवळ खडी टाकली जाते, पाऊस गेला की ती खडी रस्त्यावर अन्यत्र पसरते आणि त्यामुळे दुचाकीसह अन्य वाहनांचे अपघात होतात. नागरिक जखमी होऊन जायबंदी होतात, पण मनपा अधिकाऱ्यांना मात्र त्याचे काहीही सोयरसुतक नाही, याची खंत आहे.वर्षानुवर्षे आम्ही खड्ड्यांबाबत पत्रव्यवहार केले, पण आयुक्त बदलले, पण रस्ते जैसे थे राहिले आहेत. सामान्यांचे अपघातात बळी जातात, ते जखमी होतात, खड्डे मात्र वाढतात, पण कमी होत नाहीत. काँक्रिटचे रस्ते आता कुठे केले, पण त्यातील अनेक ठिकाणी रिकास्टिंगची गरज आहे, असे ते पुढे म्हणाले. भ्रष्टाचार बोकाळला असून सर्वत्र अनागोंदी कारभार असल्याचे सांगत ते म्हणाले की, ते पाहून अस्वस्थ व्हायला होते. एकाही अधिकाºयाला काहीच पडलेली नाही, जो तो त्या भ्रष्टाचारामधला एक भाग होतो आणि नोकरीची वर्षे ढकलतो. म्हणूनच, एवढ्यात एकही प्रकल्प मार्गी लागला नाही. सगळी कामे अर्धवट, तर काही कागदावरच आहेत. तक्रारी तरी किती करायच्या, असे सांगून त्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडल्यास त्यावर खडीकरण करूनच तात्पुरते ते बुजवण्यात येतात. आताही १० आॅक्टोबरपर्यंत पाऊस पूर्णत: थांबला तर मात्र त्यानंतर डांबरीकरण करून रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. - सपना कोळी,शहर अभियंता, केडीएमसीखड्डे भरण्याच्या कामात भ्रष्टाचार झाला, असा आरोप आमदार गायकवाड करत असतील तर आता स्थायी समितीचे सभापती भाजपचेच आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे विचारणा करावी आणि तसे झाले असेल तर ते गंभीर आहे. आता पाऊस कमी झाल्याने खड्डे भरणे व डांबरीकरणाचे काम प्रशासन हाती घेणार आहे.- विनीता राणे, महापौर, केडीएमसी
"केडीएमसीत खड्डे भरण्याच्या कंत्राटात झाला भ्रष्टाचार"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 1:17 AM