लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने कोरोना संसर्ग काळात अलगीकरण व विलगीकरण कक्ष मधील नागरिकांसाठी खरेदी केलेल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू ह्या छापील किमती पेक्षा तीन ते चार पटीने जास्त दराने खरेदी केल्या आहेत . सर्वच वस्तू ह्या अवास्तवदराने खरेदी करून ह्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार भाजपचे नगरसेवक श्रीप्रकाश उर्फ मुन्ना सिंह यांनी केली आहे . पालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असून कोरोना साहित्य खरेदीतील भ्रष्टाचाराच्या आरोपाने खळबळ उडाली आहे .
नगरसेवक मुन्ना सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ह्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे . त्यांनी पालिकेने खरेदी केलेले साहित्यच आणून त्याची मूळ छापील किंमत व पालिकेने अवास्तव पटीने दिलेले देयक याची जंत्रीच सादर केली . कोरोना संसर्ग सुरु झाल्याने महापालिकेने कोरोनाचा संसर्ग झालेल्यांच्या तसेच संपर्कातील लोकांसाठी अलगीकरण व विलगीकरण केंद्र सूरु केली होती .
त्याठिकाणी लोकांना ठेवले जात असल्याने त्यांना मिनरल पाणी , साबण , टूथपेस्ट , मच्छर लिक्विड , चादर , भांडी , शाम्पू आदी विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली . सदर ठेका त्यांनी एम . एस . इन्टरप्रायझेसला दिला होता .
मे ते १७ जुलै २०२० पर्यंतच्या उपलब्ध देयक मंजुरीच्या कागदपत्रां नुसार पालिकेने १ कोटी ५९ लाख २२ हजारांची खरेदी केली . त्या नंतर देखील खरेदी झालेली असलेली तरी त्याची देयके उपलब्ध नसल्याचे सिंह म्हणाले .
गुडनाईट मच्छर लिक्विडची छापील किंमत ८९ रुपये असताना त्याची खरेदी तब्बल १७५ रुपये प्रति नगर दराने केली आहे . १५ रुपयाची टूथपेस्ट ६७ रुपयांना ; ६० रुपयांची टॅल्कम पावडर १६० रुपयांना ; १० रुपयांचा आंघोळीचा साबण ३२ रुपयांना ; ४६ रुपयांच्या केसाच्या तेलाची बाटली १०० रुपयांना ; १४५ रुपयांचा बिसलेरी पाण्याचा बॉक्स २४० रुपयांना खरेदी केल्याचा आरोप मुन्ना सिंह यांनी केला आहे .
अन्य साहित्य देखील जास्त दराने खरेदी केले असून मोठ्या संख्येने साहित्य खरेदी केले असताना छापील किमती पेक्षा अवास्तव दर कसे पालिकेने दिले ? ह्या प्रकरणी पालिकेचे बांधकाम विभागातील सर्व संबंधित अधिकारी आणि देयके मंजूर करणारे अधिकारी तसेच ठेकेदार यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा . अन्यथा आपल्याला न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा सिंह यांनी दिला आहे .