भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या जाहिरात विभागात २१ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष परेश चौधरी यांनी मनपा आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केला आहे. यासंदर्भातील पुरावेदेखील त्यांनी मनपा आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीसोबत दिले आहेत.भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नियोजित ठिकाणावर जाहिरात, आकाश चिन्ह (होर्डिंग) फलक प्रसिद्ध करण्याचा अधिकार कामाचा ठेका मे. ब्लू. आय. मार्केटिंगचे मालक अजित घाडगे यांना दिला होता. १ नोव्हेंबर २०१४ ते ७ नोव्हेंबर १७ या चार वर्षांच्या कालावधीसाठी तो देण्यात आला होता. विशेष म्हणजे या चार वर्षांत या ठेकेदाराने महापालिकेने केलेल्या करारनाम्यानुसार भाड्यापोटी २१ लाख ४९ हजार ५८६ रुपये महापालिकेला भाडेपोटी भरणे गरजेचे होते. मात्र, घाडगे यांनी यापैकी एक रुपयाही महापालिकेला भरलेला नाही. त्यामुळे या ठेक्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून, जाहिरात विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे त्याला खतपाणी मिळत असल्याचा आरोप मनविसेनेचे परेश चौधरी यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे.यासंदर्भात अनेक प्रश्न करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांची मालमत्ता जप्त का केली नाही, भाडे थकवलेप्रकरणी फौजदारी कारवाई का केली नाही, करारनाम्याच्या कलम ४ अन्वये द्वितीय पक्ष हप्त्याची रक्कम प्रत्यक्ष जमा करेपर्यंत प्रतिवर्षीप्रमाणे १८ टक्के दराने व्याज देणे बंधनकारक असताना, त्याच्याकडून व्याजाची वसुली का केली नाही, असे अनेक प्रश्न निवेदनात मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याकडे विचारले आहेत.
भिवंडी पालिकेच्या जाहिरात विभागात २१ लाखांचा भ्रष्टाचार; मनसेचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 12:11 AM