लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महापालिकेतील छोट्या-मोठ्या समारंभांबरोबरच पाहुण्यांना पुष्पगुच्छ, हार-तुरे, फुले, तुळशीचे रोप आदी साहित्य देण्यासाठी दररोज साडेपाच हजार रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. २०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षांसाठी तब्बल ४० लाख रुपयांचे कंत्राट देण्याच्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महासभेत ठेवलेल्या प्रस्तावाला भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला आहे.
महापालिकेतील विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ व उपक्रमांसाठी आणि पदाधिकारी-अधिकारी यांना पुष्पगुच्छ, तुळशी रोप, हार, तुरे, फुलांची सजावट आदी करण्यासाठी निविदा मागविली होती. मात्र, दोन वेळा मुदतवाढ देऊनही केवळ एकाच कंत्राटदाराने ती भरली होती. या कंत्राटदाराने दोन वर्षांसाठी ४० लाख रुपये आकारले आहेत. त्यात तुळशीचे रोप ३० रुपये, १२ फूट पुष्पहार २१०० रुपये, ८ फूट पुष्पहार १००० रुपये, ६ फूट डबल हार, व्हीव्हीआयपी बुके ८०० रुपये, व्हीआयपी बुके ५५० रुपये, बुके मिडियम २८० रुपये, छोटा बुके १८० रुपये, फुलांचे चार पदरी तोरण १२० रुपये फूट, फुलांची माळ प्रति फूट १५ रुपये, गुलाबाचे फूल ७ रुपये, सोनचाफ्याचे फूल ४ रुपये असा दर निश्चित केला. तोही वाटाघाटीनंतर ठरविला. तसेच बाजारभावापेक्षा तो कमी असल्याचे महापालिकेच्या गोषवाऱ्यात म्हटले आहे.
एकच निविदा प्राप्त कोरोनामुळे ठामपाचे उत्पन्न घटणार आहे. प्रशासनाकडून एकीकडे नगरसेवक निधीवर कात्री चालविली जाते. मात्र, अन्य बाबींवर उधळपट्टी सुरू आहे. समारंभांसाठी पुष्पगुच्छ, हार-तुऱ्यांसाठी दरवर्षी २० लाख खर्च करण्याचा प्रकार संतापजनक आहे. त्यानुसार मनपाकडून पुष्पगुच्छ व हारांसाठी दररोज किमान साडेपाच हजार रुपये खर्च केला जाणार आहे. तर मासिक एक लाख ६७ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. पुष्पगुच्छ व हार-तुरे पुरविण्यासाठी केवळ एकच निविदा प्राप्त झाली आहे. या निविदाकारालाच मंजुरी देण्याचा घाट का घातला जात आहे? असे सवाल पवार यांनी विचारले आहेत.