ठाणे : कधीही या कसेही जा, असे म्हणत येऊरला अनेक जण मॉर्निंग वॉकला, कोणी पार्टीसाठी, तर कोणी मौजमजेसाठी कसेही जात होता. परंतु, आता तुम्हाला मॉर्निंग वॉकला जायचे असेल, तर वार्षिक १९५ रुपयांचा पास काढून पहाटे ५ ते ८ या वेळेत फिरायला जा तसेच इतर वेळी फिरण्यासाठी येणाऱ्या मंडळींना ५३ रुपयांचे तिकीट आकारले जाणार आहे. त्याची सुरुवात सोमवारपासून करण्यात आली.सोमवारी दिवसभरात मॉर्निंग वॉकला जाणाºया सुमारे ७५ हून अधिक जणांनी वार्षिक पास काढल्याची माहिती येऊर वनविभागाने दिली.
येऊरला जाणे म्हणजे आता खिशाला चाट सहन करावे लागणे आहे. काही दिवसांपूर्वी येथे मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांना बिबट्याचे पिलू सापडले होते. त्यानंतर, येऊरच्या घनदाट जंगलाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. येऊरला जाण्यासाठी यापूर्वीदेखील शुल्क आकारले जात होते. परंतु, त्याची कडक अंमलबजावणी केली जात नव्हती. त्यामुळे याठिकाणी मॉर्निंग वॉकला जाणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली.
आजघडीला येथे २५० च्या आसपास रहिवासी हे मॉर्निंग वॉकसाठी येथे जात असल्याची माहिती वनविभागाने दिली. शिवाय, इतर वेळी तरुणतरुणीदेखील या ठिकाणी फिरण्यासाठी येऊ लागले होते. काहींकडून तिकीट आकारले जायचे, तर काहींकडून ते आकारले जात नव्हते. त्यामुळे आओ-जाओ घर तुम्हारा, अशी परिस्थिती झाली होती. परंतु, येऊर वनविभागाने येणाºया जाणाºयांसाठी आता कडक नियम केले असून पहाटे ५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच तुम्हाला येथे जाता-येता येणार आहे. त्यानंतर, जर तुम्हाला जायचे असेल, तर त्यासाठी ५३ रुपयांचे तिकीट तुम्हाला काढावे लागणार असून रात्री ११ वाजेपर्यंत तुम्हाला खाली यावे लागणार आहे. असा नियमच आता तयार केल्याची माहिती वनविभागाने दिली.
मॉर्निंग वॉकला जाणाºयांबरोबरच इतर लोकांचा आकडा हादेखील रोजचा २५० हून अधिकचा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या सर्वांनी नियमांचे पालन करावे, यासाठी आता कठोर नियम केले आहेत. परंतु, मॉर्निंग वॉकसाठी जाणाºया ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिली आहे. मात्र, इतरासांठी वार्षिक १९५ रुपये भरावे लागणार आहेत.
शिवाय, मॉर्निंग वॉकला जाणाºयांनी पहाटे ५ ते ८ याच वेळेत वर जाऊन खाली यावे, असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार, पहिल्याच दिवशी साधारणपणे ७५ हून अधिक जणांनी हा वार्षिक पास काढण्याची माहिती वनअधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली.
आधी तिकीट, मगच प्रवेश
याठिकाणी मौजमजा करण्यासाठी काही बंगले आहेत, तर हॉटेलदेखील आहेत. पूर्वी सरसकट कोणत्याही वाहनाला सोडले जात होते. परंतु, आता त्यांच्यासाठी आधी येथे तिकीट फाडावे लागणार आहे. त्यानंतरच वर जाण्यास प्रवेश दिला जाणार आहे.