मीरारोड - दिड लाखांच्या बनावट नोटा व तलवारींसह आदी शस्त्रे सापडल्याने ५ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच सदर बनावट नोटा छापणाऱ्या म्होरक्याच्याही नवघर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. येथील नया नगरच्या दिशेने आलेल्या चारचाकी गाडीतील फैजल इंद्रिस शेख, सय्यद रिजवान आयाज सय्यद, इमान अस्लम चारोली, सौद सलीम सय्यद ( सर्व रा. नया नगर, मीरारोड ) व मनीष मेखयानी या पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे दोन हजार आणि दोनशे रुपयांच्या एकूण दिड लाख रुपयांच्या नोटा व तलवारींसह आदी शस्त्रे सापडली होती.
बनावट नोटा घेऊन हे सर्व आरोपी मौजमजा करण्यासाठी निघाले होते. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर बनावट नोटा या फैजलचा बाप इंद्रीस याने छापल्याचे निष्पन्न झाले आहे. २०१६ सालापासून तो बनावट नोटा छापत होता. पण अंधेरीच्या आंबोली पोलीस ठाण्यात बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी त्याला अटक झाल्यानंतर त्याने नोटा छापणे बंद केले होते. मात्र, आधी छापलेल्या नोटा वापरायचा प्रयत्न त्याच्याकडून सुरुच होता. दरम्यान, नोटा छापण्यासाठी वापरलेला प्रिंटर त्याने फेकून दिल्याचे सांगितले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी दिली. फैजल व इंद्रीस यांना ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.