ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी, मुरबाड, शहापूर या तीन तालुक्यांमधील सात ग्राम पंचायतींच्या ७२ सदस्यांपैकी ३० सदस्य बिनविरोध निवडून आलेत. उर्वरित सदस्यांसाठी पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी शांततेत पार पडली. यावेळी निश्चित झालेल्या विजयी उमेदवारांना त्यांचे अधिकृत प्रमाणपत्र दोन दिवसांनी प्रशासनाव्दारे दिले जाणार आहे.आॅक्टोंबर ते फेब्रुवारी या दरमयान मदत संपणाऱ्या ग्राम पंचायतींसाठी या निवडणुका घेण्यात आल्या. यात पोट निवडणुकांचाही समावेश होता. यावेळी तीन ग्राम पंचायतींच्या सरपंच पदासाठी उमेदवारी अर्जच प्राप्त झाले नाही. यामुळे संबंधीत ग्राम पंचायत सरपंच पदासाठी यावेळी मतदान प्रक्रिया पार पडली नाही. भिवंडी तालुक्यातील एका ग्राम पंचायतीच्या १४ सदस्यांसाठी मतदान होणार होते. यातील दोन जागांसाठी नामनिर्देशनपत्र आले नाही . तर ११ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित केवळ एका जागेसाठी भिवंडीतील ग्राम पंचायतीमध्ये ५२९मतदारांपैकी ३७५ जणांनी मतदान केले होते. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यातही दोन ग्राम पंचायतींच्या निवडणुका हाती घेतल्या होत्या. यातील १६ सदस्यांपैकी एका जागेसाठी उमेदवारी प्राप्त झाली नाही. तर उर्वरित नऊ जागा बिनविरोध निवडून आल्या. प्रत्यक्षात केवळ सहा जागांसाठी ९२७ मतदारांपैकी ७५९मतदान होईल.शहापूर तालुक्यातील चार ग्राम पंचायतींपैकी एक ग्राम पंचायत पूर्णपणे बिनविरोध निवडून आली होती. उर्वरित तीन ग्राम पंचायतींच्या ४२ सदस्यांपैकी दहा सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित तीन ग्राम पंचायतींच्या ३२ जागांसाठी पाच हजार १२५ मतदारांपैकी तीन हजार ९२० जणांनी मतदान केले होते. सरपंच पदासाठीच्या पोटनिवडणुका शहापूर आणि भिवंडी तालुक्यात आहेत. यातील भिवंडीच्या एका सरपंचासाठी उमेदवारी अर्जच आलेला नव्हता. शहापूरच्या तीन सरपंच पदांपैकी दोन ठिकाणी उमेदवार मिळाले नाही. यामुळे सरपंचाच्या एका जागेसाठी ९८२ मतदारांपैकी ७७३ जणांनी मतदान केले. यातील विजयी उमेदवारांना प्रशासनाव्दारे सुमारे दोन दिवसांनी प्रशस्तीपत्र देऊन अधिकृत विजयी उमेदवार म्हणून घोषीत केले जाणार आहे.