ठाणे : रानडुकरांच्या शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या गावठी बॉम्बचा मोठा साठा ठाणे पोलिसांनी शनिवारी शिळफाटा परिसरातून हस्तगत केला. याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील एका आरोपीस पोलिसांनी अटक केली.गावठी बॉम्बच्या विक्रीसाठी एक आरोपी शिळफाटा येथे येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १ चे सहायक पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांना शनिवारी मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या मार्गदर्शनाखाली शिळफाटा येथील एका हॉटेलसमोर सापळा रचण्यात आला. त्यावेळी एका इसमाच्या संशयास्पद हालचाली दिसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता पिशवीमध्ये गावठी बॉम्बचा मोठा साठा दिसला. खात्री पटवण्यासाठी बॉम्बशोधक आणि नाशक पथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या पथकातील श्वानाने भुंकून ती स्फोटके असल्याचे संकेत दिले. पथकातील अधिकारी, कर्मचाºयांनी त्यापैकी एक बॉम्ब उघडून पाहिला असता, स्फोटक आणि छर्रे असलेला हा बॉम्ब जिवंत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील रेवसजवळ असलेल्या नौखार मोरपाडा येथील प्रविण अर्जुन पाटील (३४) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळून २ लाख ३२ हजार रुपयांचे २९0 गावठी बॉम्ब पोलिसांनी हस्तगत केले. त्याच्याविरूद्ध शिळडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदिप बागुल करीत आहेत.आरोपी एवढ्या मोठ्या प्रमाणात बॉम्ब कुणाला विकायला आला होता आणि ते कुठून आणले होते, या दोन महत्वाच्या मुद्यांवर तपास सुरू आहे. यासंदर्भात काही महत्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. बॉम्ब बनवण्यासाठी आरोपीने स्फोटके कुठून आली, हादेखील महत्वाचा प्रश्न असून, त्याअनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी संदिप बागुल यांनी दिली.
रानडुकरांच्या शिकारीसाठी वापरला जाणारा गावठी बॉम्बचा साठा ठाण्यात हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 8:12 PM
प्राण्यांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारा गावठी बॉम्बचा मोठा साठा ठाणे पोलिसांनी हस्तगत केला असून, याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
ठळक मुद्देठाणे पोलिसांची कारवाई२९0 बॉम्ब हस्तगतरायगड जिल्ह्याच्या रहिवाशास अटक