उल्हासनगर: कॅम्प नं. १, शहाड फाटक परिसरातील राजीव गांधीनगरमध्ये राहणाऱ्या सचिन सुतार व त्यांची पत्नी शर्वरी यांनी शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला. रविवारी सकाळी त्यांची दाेन लहान मुले झोपेतून उठल्यानंतर त्यांनी घराचे दार उघडून झालेला प्रकार शेजारील नागरिकांना सांगितला. आर्थिक विवंचनेतून या दाम्पत्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.राजीव गांधीनगर परिसरात राहणारे सचिन सुरेश सुतार फर्निचरचे, तर पत्नी शर्वरी घरकाम करीत होती. त्यांना पराग व यशार्थ अशी ५ ते ६ वर्षांची दोन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना काम नसल्याने, घरात आर्थिक अडचण जाणवत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. दरम्यान, दिवाळीनिमित्त रत्नागिरी येथील गावी गेलेले सुतार कुटुंब शनिवारी (दि. २०) परत आले. स्थानिक रहिवासी व मनसेचे माजी शहर, जिल्हाध्यक्ष संजय घुगे यांनी याबाबतची माहिती उल्हासनगर पोलिसांना दिली. शनिवारी मध्यरात्री मुले झोपल्यानंतर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत. रविवारी सकाळी दोन्ही मुले झोपेतून उठल्यावर त्यांना आई-वडील मृतावस्थेत दिसले. त्यांनी घराचे दार उघडून शेजाऱ्यांना ही माहिती दिल्याने परिसरात खळबळ उडाली.
परिसरात हळहळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. सचिन सुतार यांचे आई-वडील व भाऊ डोंबिवली येथे राहत असून, त्यांना बोलावून घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली. आई-वडिलांच्या आत्महत्येने दोन्ही मुले अनाथ झाली असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.