डोंबिवली : कोरोनाशी दोन हात करण्यासाठी लसीकरण हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी वेळोवेळी सांगितले आहे. मात्र, काही नागरिक अजूनही लस घेण्याबाबत संभ्रमात असल्याचे दिसून येते. कोरोनाशी लढा देण्यासाठी अपंगही पुढे येऊन लस घेत आहे. त्यातच डोंबिवलीतील १०३ वर्षांच्या आजींनीही शनिवारी कोविड लस घेतली आहे.
कृष्णाबाई महाजन असे या आजींचे नाव असून, त्यांनी पूर्वेतील केडीएमसीच्या पाटकर शाळेतील लसीकरण केंद्रावर ही लस घेतल्याची माहिती त्यांचे पणतू जयेश अग्निहोत्री यांनी दिली. त्यामुळे अद्यापही कोविड लस घेण्यासाठी साशंक असणाऱ्यांसाठी या आजींनी लस घेत एकप्रकारे सकारात्मक संदेश दिला आहे. दरम्यान, यापूर्वीच जुलैमध्ये रामचंद्रनगरमध्येही डोंबिवलीभूषण पुरस्काराने गौरवलेले केशव गोविंद भगत या ९७ वर्षांच्या आजोबांनीही कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
-------------