ठाणे : देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीत ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत असतानाच कोविड लसीकरणाला ब्रेक लागण्याची चिन्हे दिसू लागली आहे. कारण ठाण्यात कोव्हिशिल्ड लसीचा साठा संपत आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आधी ज्यांनी ज्यांनी ही लस घेतली आहे, त्यांना या लसीचा दुसरा डोस मिळणार की नाही? याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात सोमवारी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली. परंतु, कोव्हिशिल्डचा पुरेसा साठा करून ठेवला असून दुसरा डोस वेळेवर दिला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
केंद्र शासनाने निर्देशित केलेल्या शहरातील ६० वर्षे पूर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाइन वर्कर्स, ४५ वर्षांवरील विविध व्याधीग्रस्त लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी ठाणे महापालिकेने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. यासाठी शहरात खासगी ११ व ४२ शासकीय अशा ५३ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित केली आहेत. त्यानुसार, सिरमच्या कोव्हिशिल्ड लसीद्वारे दररोज सुमारे सात हजार ५०० नागरिकांचे लसीकरण होते. त्यानुसार आतापर्यंत त ८२ हजार नागरिकांचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, सद्यस्थितीत कोव्हिशिल्ड लसीचा साठा संपत आला असून जेमतेम दोन दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने कोविड लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेले काही दिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ठाणे शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केळकर यांनी सोमवारी ठामपा आयुक्तांची भेट घेऊन लसीकरणाबाबत चर्चा केली. तसेच, लस पुरवठ्याबाबत आढावा घेत शासन दरबारीही पाठपुरावा करणार असल्याची माहिती दिली. यावेळी आयुक्तांनी १० हजार कोव्हॅक्सिन लसींचा पुरवठा आल्याचे स्पष्ट करून त्याबाबतच्या प्रशिक्षणाला दुजोरा दिला. मात्र, यापूर्वी तब्बल ८२ हजारांहून अधिक नागरिकांना पहिला डोस कोव्हिशिल्डचा दिलेला असताना त्यांना दुसरा डोस अन्य लसीचा चालणार नाही. तेव्हा, कोव्हिशिल्ड लस घेतलेले नागरिक धास्तावले आहेत. परंतु, यासंदर्भात आयुक्तांनी सांगितले की, आधी ज्या ज्या नागरिकांनी कोव्हिशिल्डची लस घेतलेली आहे, त्यांना दुसरा डोस देण्यासाठी त्याचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे त्यांना कोव्हिशिल्डचीच लस दिली जाईल. तसेच आता १० हजारांच्या आसपास कोव्हॅक्सिनचा साठा उपलब्ध झाला असून त्याचेही डोस दिले जाणार आहेत.