मीरारोड : भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील १५६ परिचारिका, सफाई कामगार आदी कंत्राटी कोविड योद्ध्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. शासनाची आर्थिक तरतूद नसल्याने ठेकेदाराकडून या कर्मचाऱ्यांना पगार दिला जात नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले.
दोनशे खाटांचे हे रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. कोरोना संसर्गकाळात जोशी रुग्णालयात मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांवर उपचार होऊन त्यांना दिलासा मिळाला. स्वतःची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या १५६ कंत्राटी परिचारिका, सफाई कामगारांना मार्च ते जून असा चार महिन्यांचा पगार मिळालेला नाही.
कंत्राटी कामगार असल्याने आधीच तुटपुंजा पगार हाती येतो. त्यात चार महिन्यांपासून पगार नसल्याने घर चालवायचे कसे, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर ठाकला आहे. शासनाची आर्थिक तरतूद नसल्याने आरोग्य सेवा संचालनालयाकडून ठेकेदारास वेतनाचे पैसे मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास ठेकेदाराने हात वर केले आहेत.
श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी, पगार झाला नाही तर बुधवारी सकाळपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेऊन भीक मांगो आंदोलन करणार असल्याचा इशारा आरोग्य सेवा संचालनालयाला दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित हे स्वतः या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.
.........
वाचली