नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: सहकारी मित्र दारूच्या नशेत सतत आई-वडिलांवरून शिवीगाळ करत असल्याच्या रागातून सहकारी मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शहरातील दत्तु नगर भादवड येथे घडली होती. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत होता. भिवंडी गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे केलेल्या तपासातून या हत्येतील आरोपीच्या मुसक्या मध्य प्रदेशातील कटनी येथून आवळून आरोपीस अटक केली असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेने गुरुवारी दिली आहे.
रवीकुमार विष्णू सिंग वय २९ वर्ष रा. कदमटोली जिल्हा जसपुर, राज्य छत्तीसगढ असे अटक आरोपीचे नाव आहे तर चित्तरंजन नागेशिया वय ३० वर्ष राहणार कदम टोली असे हत्या झालेल्या दुर्दैवी इसमाचे नाव आहे.आरोपी रविकुमार व मयत चित्तरंजन हे दोघेही एकमेकांचे साथीदार असून भादवड येथील दत्तु नगर परिसरात राहत होते. काही दिवसांपूर्वी दोघेही एकत्र दारू पिण्यास बसले असताना मयत चित्तरंजन याने आरोपी रवी कुमार यास आई-वडिलांवरून शिवीगाळ केली होती. या गोष्टीचा राग म्हणून मनात धरून रविकुमार याने दगडाने ठेचून व धारदार हत्याराने चित्तरंजन याची हत्या केली व मध्य प्रदेश येथे पळून गेला होता.
भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी रविकुमार हा मध्य प्रदेश येथे पळून गेला असल्याची खबर मिळताच भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार पोलीस हवालदार साबीर शेख सुनील साळुंखे प्रकाश पाटील वामन भोईर निलेश बोरसे सचिन जाधव सुदेश घाग पोलीस शिपाई उमेश ठाकूर भावेश घरत अमोल इंगळे चालक पोलीस शिपाई रवींद्र साळुंखे यांच्या पथकाने आरोपीचा तपास करून मध्य प्रदेश येथील कटनी रेल्वे स्टेशन येथून सीआरपीएफ पोलिसांच्या मदतीने पळून जाण्याचा तयारीत असलेला आरोपी रवीकुमार यास अटक केली.