अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: नौपड्यातील तळ अधिक ३ मजली असलेल्या वसंत को. ऑफ. हाउसिंग सोसायटी या इमारतीच्या भिंतीला व पिलरला अनेक ठिकाणी तडे गेले. ती इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत असून त्यामध्ये सद्यस्थितीत कोणीही रहिवाशी राहत नाही, मात्र तळ मजल्यावरती असणाऱ्या गाळ्यामध्ये पिठाची गिरणी सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
गुरुवारी सकाळी १० वाजून ३९ मिनिटांच्या सुमारास ४७ वर्षे जुनी असलेल्या या इमारतीच्या भिंतीला व पिलरला अनेक ठिकाणी तडे गेल्याची माहिती माजी नगरसेवक सुनेश जोशी यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली.ही इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. इमारती च्या प्रत्येक मजल्यावर प्रत्येकी दोन फ्लॅट असून तळ्यावर एक गाळा आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी, नौपाडा-अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. सुदैवाने या मध्ये कोणालाही दुखापत नाही. धोकादायक इमारतीमध्ये सद्यस्थितीत कोणीही रहिवाशी राहत नसून, तळ मजल्यावरती असणाऱ्या गाळ्यामध्ये पिठाची गिरणी सुरू असून, त्यामध्ये राजु खरवार हा एक कर्मचारी काम करत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.