लोकमत न्यूज नेटवर्क मुंब्रा : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. मात्र, यानंतरही मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. ते मार्गी लावण्यासाठी आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मुस्लिम समाजाचा नेता निर्माण करा. त्यासाठी एमआयएम पक्षाला मजबूत करा, असे आवाहन एमआयएम पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी रात्री मुंब्र्याच्या एमएम व्हॅली परिसरातील सभेत केले.
शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस नेते बनू शकतात तर मग तुम्ही का नेता बनू शकत नाही, असा प्रश्न त्यांनी सभेत केला. पक्षाच्या दोन दिवसांच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झालेल्या सभेत ते बाेलत हाेते.
युनिक सिव्हिल कोडच्या नावाने पंतप्रधान मोदी आणि आरएसएस मुस्लिम धर्मीयांच्या धार्मिक पेहरावात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता त्यांच्यावरही त्यांनी शाब्दिक हल्ला चढवला.
आगामी विधानसभा निवडणुकीत मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे पक्षाचे अध्यक्ष सैफ पठाण यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. देशाच्या विविध राज्यांतून आलेले पक्षाचे पदाधिकारी तसेच खा. इम्तियाज जलील, आ. वारीस पठाण आदींनी पक्षाला मजबूत करण्याचे आवाहन केले.