कल्याण- दिवा शहर व परिसरातील गावांसाठी नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करा अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केली आहे.याबाबतचे पत्र सुद्धा गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले आहे.
दिवा शहर आणि परिसरातील गावांसाठी वेगळे पोलीस स्टेशन असावे अशी मागणी वारंवार होत आहे.दिवा शहर आणि परिसराची लोकसंख्या पाच लाखापेक्षा जास्त आहे. परंतु दिवा परिसरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन नसून मुंब्रा पोलीस स्टेशनला हा सर्व भाग जोडलेला आहे.मुंब्रा पोलीस स्टेशनवर आधीच भार असताना दिव्यातील पाच लाख पेक्षा अधिक लोकसंख्येच्या परिसराला केवळ २० ते २५ पोलीस कर्मचारी मिळतात.त्यामुळे दिवा शहर परिसरासाठी लोकसंख्येनुसार स्वतंत्र पोलीस स्टेशनची निर्मिती करावी, अशी वारंवार मागणी करण्यात येत आहे.दिवा शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच गेल्या काही वर्षात गुन्हेगारी वाढली आहे.
खून, चोऱ्या, दरोडे, विनयभंग, फसवणूक असे प्रकार वारंवार घडत आहेत. परंतु स्वतंत्र स्टेशन व वरिष्ठ दर्जाचे अधिकारी नसल्यामुळे अशा गुन्ह्यांची उकल होण्यास अचडण येत आहे. तरी तातडीने लक्ष घालून दिवा शहर व परिसरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची निर्मिती करुन सहकार्य करावे अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांची गृहमंत्र्यांकडे केली आहे.तर याबाबतचे पत्र सुद्धा दिले आहे.