कल्याण : देशाच्या विकासासाठी छोटछोट्या राज्यांची निर्मिती झाली पाहिजे, अशी संकल्पना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची होती. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात सत्तेवर आली, तर आम्ही विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि खानदेश अशा चार राज्यांची निर्मिती करू, असे प्रतिपादन बसपा नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश साखरे यांनी नुकतेच कल्याणमध्ये केले.छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत रोहिदास महाराज, गाडगे महाराज आणि माता रमाई यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त येथील गिरिजा सभागृहात बसपातर्फे कल्याण व भिवंडी लोकसभा क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचे संमेलन पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून साखरे उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर प्रदेश महाप्रभारी प्रा. नामदेव खंदारे, महासचिव प्रशांत इंगळे, प्रदेश सचिव दयानंद किरतकर, सुनील खांबे आणि अशोक सिंग आदी उपस्थित होते.या वेळी साखरे पुढे म्हणाले, केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेले भाजपा सरकार पुरते अपयशी ठरले आहे. सत्तेत येण्याआधी विदर्भ वेगळा करण्याची भाषा करणारी भाजपा सत्तेत आल्यावर गप्प का? राज्यातील कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत असताना आता मंत्रालयातही आत्महत्या होताना दिसतात. भाजपाने नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत.देशात भ्रष्टाचार होत असल्याचे कारण पुढे करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी नोटाबंदी केली. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मात्र, भाजपाच्या नेत्यांवर नोटाबंदीचा काहीही परिणाम झालेला नाही. भारतात सर्वात जास्त जीएसटी लागू केली आहे. नोटाबंदी ते जीएसटी या काळात महाराष्ट्रात खूप उद्योगधंदे बंद पडल्याने परिणामी बेरोजगारी वाढली. म्हणून, हे सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. भाजपा सरकार खोटे बोलते. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला चार वर्षे झाली, मात्र अद्याप नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख रु पये जमा झाले नसल्याकडे साखरे यांनी लक्ष वेधले.नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांचे संघटनकौशल्य फार चांगले असल्याने आता आमचा विश्वास वाढला आहे. आगामी निवडणुकीत बहुजन पार्टीचे विधानसभेत आणि लोकसभेत मोठ्या संख्येने सदस्य असतील, असा विश्वास प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांनी व्यक्त केला.
देश विकासासाठी छोटी राज्ये निर्माण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:47 AM