ठाणे : आभासी चलनाची (क्रिप्टोकरन्सी) निर्मिती करून त्यात गुंतवणुकीचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या टोळीपैकी तहा हाफीझ काझी (२६, कौसा, ठाणे) याला सोमवारी रात्री अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली. या कारवाईमध्ये फ्लिनस्टोन ग्रुपच्या ठाणे आणि विक्रोळीतील कार्यालयातून ५३ लॅपटॉप, मोबाइल आणि बनावट दस्तऐवज हस्तगत केल्याचेही त्यांनी सांगितले.ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील ‘बिझनेस ओरिएंट पार्क’ येथे पहिल्या मजल्यावर असलेल्या ‘फ्लिनस्टोन ग्रुप’चा सूत्रधार अमित लखनपाल आणि त्याच्या सहकाºयांनी नियोजनबद्ध कट करून अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार दिल्लीतील प्रवीण अग्रवाल यांनी ४ जून रोजी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याकडे केली. आॅगस्ट २०१७ ते एप्रिल २०१८ या कालावधीत लखनपाल आणि त्याच्या साथीदारांनी भारतीय अर्थ मंत्रालयाचे प्रतिनिधी असल्याचे बनावट व्हिजिटिंगकार्ड दाखवून ‘फ्लिनस्टोन ग्रुप’ या कंपनीच्या माध्यमातून मनी ट्रेड कॉइन (एमटीसी) नावाने कोणताही कायदेशीर आधार नसताना आभासी चलनाची निर्मिती केली. नंतर, त्यामध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल, असे सांगून अनेक गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत लखनपाल आणि त्याच्या टोळीने ‘एमटीसी’ या आभासी चलनामध्ये गुंतवणूक करण्यास अनेकांना भाग पाडले. परंतु, गुंतवणूकदारांना कोणताही परतावा न देता त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार अग्रवाल यांनी ४ जून रोजी चितळसर पोलीस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी फसवणूक, अपहार, पुरावा नष्ट करणे अशा विविध भारतीय दंड संहितेच्या कलमांसह चिट फंड अॅक्ट आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल होताच सोमवारी रात्री घोडबंदर रोडवरील ‘फ्लिनस्टोन ग्रुप’च्या कार्यालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे आणि संदीप बागुल आदींच्या पथकाने काझीला अटक केली. मुख्य सूत्रधार मनी ट्रेड कॉइन या क्रिप्टोकरन्सीचा मालक लखनपाल आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. अजूनही ‘फ्लिनस्टोन ग्रुप’च्या ठाणे आणि विक्रोळीतील कार्यालयांमधील झडतीची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, काझी याला ठाणे न्यायालयाने १२ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.एचएसबीसी बँकेत२५० कोटींची मुदतठेवलखनपाल याने मनी ट्रेड कॉइनची तीन डॉलर ही किंमत स्थिर ठेवण्यासाठी एचएसबीसी बँकेत २५० कोटी रुपयांची मुदतठेव ठेवली. त्या मोबदल्यात १७५० कोटी रुपयांचेस्टॅण्ड बाय लेटर आॅफ क्रेडिटचे मिळवलेले प्रमाणपत्र अग्रवाल यांच्यासह गुंतवणूकदारांना दाखवण्यात आले. त्याबाबतही आता पोलिसांकडून या बँकेत तपास केला जाणार आहे.थेट पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार?अमित आणि त्याच्या साथीदारांनी भारतीय पंतप्रधान कार्यालय आणि अर्थ मंत्रालय यांच्याशी ट्रेड कॉइन कायदेशीर करण्याबाबत केलेला पत्रव्यवहार गुंतवणूकदारांना दाखवला. त्यादृष्टीनेही काझीकडे सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली.गुंतवणुकीसाठी काढले पुस्तकक्रिप्टोकरन्सीमध्ये लोकांनी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त होण्यासाठी लखनपाल याने क्रिप्टोकरन्सी या विषयावर लिहिलेले पाच हजार डॉलरचे पुस्तक अनेक गुंतवणूकदारांना दाखवण्यात आले. याच पुस्तकाची एक प्रत अग्रवाल यांनी तपास पथकाकडे सुपूर्द केली.
आभासी चलनाची निर्मिती करून २५ हजार गुंतवणूकदारांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 1:20 AM