ठाणे : अनेक वर्षे प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला याचे श्रेय सरकारला नसून मराठा समाजाच्या एकत्रित शक्तीला आहे. त्या एकजुटीने सरकारला हा निर्णय घ्यायला भाग पाडल्याचे अखिल मराठा संमेलनाचे स्वागताध्यक्ष, पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अखिल मराठा फेडरेशन आणि मराठा मंडळ, ठाणे आयोजित गडकरी रंगायतन येथे अखिल मराठा संमेलन आयोजित केले होते. यावेळी संमेलनाच्या समारोप प्रसंगी शिंदे बोलत होते. ते म्हणाले, अशा प्रकारचे संमेलन काळाची, समाजाची गरज आहे. मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघाले, त्या मोर्चाला गालबोट लागणार नाही याची काळजी समाजाने घेतली. मी त्या समितीत असल्याने आरक्षणाचा निर्णय लवकर कसा होईल यासाठी प्रयत्न करीत होतो. मराठ्याची एकजूट याला कारणीभूत ठरली. प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजासाठी वसतीगृह बांधण्याची मागणी केली होती, त्याची सुरूवात देखील झाली असून त्याचे काम ठाण्यातही सुरू झाले आहे. गावोगावी विखुरलेला मराठा समाज एकत्र आणून पुढे नेऊया असेही ते म्हणाले. दरम्यान, मराठा आरक्षण समितीचा सत्कार हा पालकमंत्री शिंदे यांना प्रदानित करण्यात आला. त्यानंतर अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्रचे जनमेजय राजे भोसले, कलादिग्दर्शक नितीन देसाई, ज्येष्ठ पत्रकार प्रतापराव जाधव, शिक्षणमहर्षी प्रा. दशरथ सगरे यांचा सत्कार करण्यात आला. उद्योजक दिवंगत निलकांतराव जगदाळे यांच्यावतीने कुटुंबाच्या प्रतिनिधीने सत्कार स्वीकारला. त्याचप्रमाणे अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज, गोवा, रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज, जोगेश्वरी, श्रीवर्धन - म्हसळा मराठा समाज सेवा संस्था या संस्थांचा सत्कार देखील करण्यात आला. संमेलनात मंजूर केलेले फेडरेशनचे ठराव उपाध्यक्ष सुरेश सुर्वे यांनी शासनप्रती म्हणून शिंदे यांच्याकडे सुपुर्द केला. प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांनी केले. पुरग्रस्तांसाठी पाच लाखांचा निधी मुख्यमंत्री सहाय्य निधीला देण्यात आला. यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, विद्यमान अध्यक्ष इंद्रजीत सावंत, राजेंद्र सावंत, जी.एस. परब, राजेंद्र साळवी व इतर उपस्थित होते.
मराठा आरक्षणाचे श्रेय मराठा समाजाच्या एकत्रित शक्तीला : एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 5:13 PM
ठाण्यात प्रथमच अखिल मराठा संमेलन पार पडले.
ठळक मुद्देमराठा आरक्षणाचे श्रेय मराठा समाजाच्या एकत्रित शक्तीला : एकनाथ शिंदेठाण्यात प्रथमच अखिल मराठा संमेलनपुरग्रस्तांसाठी पाच लाखांचा निधी मुख्यमंत्री सहाय्य निधीला