उल्हासनगर : कॅम्प नं-५, प्रभाराम मंदिर परिसरात शनिवारी क्रिकेट वर्ल्डकपच्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया लाईव्ह सामन्यावर क्रिकेट बेटिंग खेळणाऱ्या चौघांवर हिललाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट राऊटर आदीचे साहित्य जप्त केले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-५, येथील प्रभाराम मंदिर महावितरण कार्यालयाच्या बाजूला वर्ल्डकपच्या इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट सामन्यावर क्रिकेट बेटिंग सुरू असल्याची माहिती हिललाईन पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकून सुमित नवीन मोटवानी, दिनेश मुरलीधर रोहरा, भारत मोहन राजपाल व रॉय या चौघावर गुन्हा दाखल केला. सट्टा खेळतांना विशाल व कशीस सावलानी यांच्या कोटक महेंद्र बँक खात्याचा वापर चौघांनी करून त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले. क्रिकेट सट्टा प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून क्रिकेट सट्टासाठी वापरण्यात आलेले मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट राउटर आदी साहित्य जप्त केले आहे.
शहरात क्रिकेट सट्टाचा बोलबाला असून गेल्या आठवड्यात श्रीराम चौक व जवाहर हॉटेलच्या एका रुम मधून वर्ल्डकप क्रिकेट सामन्यावर क्रिकेट बेटिंग करण्याचा प्रकार उघड होऊन याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. एकूणच शहरात वर्ल्डकप क्रिकेट सामन्यावर क्रिकेट सट्टा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे बोलले जात आहे.