ठाणे :
विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा साेमवारी रात्री खेळ बंद पाडण्यासाठी गेल्यानंतर एका प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी माजी गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह सुमारे १०० कार्यकर्त्यांविरुद्ध ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
माजिवडा येथील रहिवासी परीक्षित धुर्वे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला. सिनेमा चालू असताना रात्री ९.५५ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे माजी मंत्री आव्हाड हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह चित्रपट बंद पाडण्याच्या उद्देशाने सिनेमागृहात शिरले. त्यांनी या ‘चित्रपटामध्ये चुकीचे दृश्य दाखविले जात असल्याने हा चित्रपट बंद करा’ असे सांगत चित्रपट बंद पाडला.
त्यावेळी चित्रपट पाहणाऱ्यांपैकी एक अनोळखी प्रेक्षक ‘असे कसे कोणीही ऐरागैरा येईल आणि चित्रपट बंद पाडेल’ असे बोलला. त्याचाच राग मनात धरून चित्रपट बंद पाडण्यासाठी आलेल्या या आक्रमक कार्यकर्त्यांपैकी काही जण चित्रपट पाहणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून गेले. तेव्हा परीक्षित आणि त्यांची पत्नी हे अग्रभागी असल्याने जमावातील आठ ते दहा लोकांनी या दोघांना धक्काबुक्की करून ठोसा-बुक्कीने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
परीक्षित यांनी आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची वर्तकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल केली. आरोपींना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.
अमोल मिटकरींनी अमेय खोपकरांना उद्या चित्रपट लावून दाखवा, असे सांगितले. त्यामुळे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराजवळ असलेल्या मॉलमध्ये 'हर हर महादेव'चा शो लावला आहे. मनसेचे कार्यकर्ते टॉकीजमध्ये आहेत. ज्याला वाटत असेल त्यांनी येऊन राडा करावा. जितेंद्र आव्हाड आम्हाला इतिहास शिकवणार का? - अविनाश जाधव, अध्यक्ष, मनसे. ठाणे जिल्हा
छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटाचे शो बंद पाडून तुम्ही महाराजांचा अपमान करत आहात. यासाठी सर्वांनी महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी. आयुष्यातील आठ वर्षे यासाठी खर्च केल्याने महाराजांचा अवमान होईल, असे संदर्भ वापरू शकत नाही. सेन्साॅर बोर्डाच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतरच चित्रपटाला प्रमाणपत्र मिळाले आहे. घडलेला प्रकार लांच्छनास्पद असून याची निंदा करतो. -अभिजीत देशपांडे, लेखक- दिग्दर्शक