कल्याण : कोरोना नियमावलीचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कल्याण-शीळ रस्त्यालगतच्या इगो बारविरोधात शुक्रवारी रात्री कारवाई करण्यात आली. हा बार उशिरा सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मानपाडा पोलिसांनी बारचालक अशोक पंडा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मनपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. मात्र, त्यानंतर काही घटना समोर आलेल्या आहेत. दाेन दिवसांत ८१ जणांविरोधात मनपाने कारवाई केली आहे. मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. मात्र, या सगळ्या कारवाईनंतर बेफिकिरीची लाट कल्याण-डोंबिवलीत दिसून येत आहे. मनपा प्रशासनाने बार जास्त वेळ उघडे ठेवण्यास परवानगी दिल्याने मनपावर टीका होत आहे. बारचालकांना रात्री ११ वाजेपर्यंत वेळ असूनही ती पुरत नसल्याची बाब इगो बारच्या प्रकरणातून समोर आली आहे.