डोंबिवली : न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीवर परस्पर बनावट दस्तावेज तयार करून ‘वीर हाइट’ नावाची इमारत बांधून सदनिकाधारकांची फसवणूक केल्याचा प्रकार दावडी भागात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक कन्हैयालाल प्रजापती, कपिल प्रजापतीसह त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.भांडुप येथे राहणारे नवथान सैद (३२) यांना घर खरेदी करायचे होते. त्यामुळे जुलै २०१७ मध्ये मित्राच्या ओळखीने बघितलेली गोळवली-दावडी येथील एक इमारत सैद यांना पसंत पडली. त्यावेळी या इमारतीचे सात माळ्यांचे काम पूर्ण झाले होते. या इमारतीत घर घेण्यासाठी सैद मित्रासोबत विकोनाका परिसरात असलेल्या प्रजापती क न्स्ट्रक्शनच्या कार्यालयात गेले. याठिकाणी असलेल्या कन्हैयालाल आणि कपिल यांनी इमारतीची कागदपत्रे तसेच इतर परवानग्या मिळाल्याचे सैद यांना सांगितले. त्यावर विश्वास ठेवून सैद यांनी ७ जुलैला कन्हैयालाल याला ४० हजार रुपयांचा धनादेश अनामत रक्कम म्हणून दिला. तसेच टप्प्याटप्प्याने पैसे देण्यास कन्हैयालालने सैद यांना सांगितले.सैद यांनी सुमारे २४ लाख ४१ हजार रुपये दिल्यानंतर त्यांना घराचा ताबा देण्यात आला. जून २०१८ मध्ये सैद परिवारासह वीर हाइट या इमारतीमध्ये राहायला आले. त्यानंतर, २३ आॅगस्ट २०१८ रोजी इमारतीमध्ये राहणाऱ्या सदनिकाधारकांना केडीएमसीने नोटीस पाठवल्या होत्या. पण, त्या नोटीस कन्हैयालालने त्यांच्यापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. हे समजताच त्यांनी याबाबत कन्हैयालालच्या कार्यालयात जाऊ न विचारणा केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.रहिवाशांना धमकावलेडॉ. सुरेखा भालेराव यांच्या मालकीच्या जागेवर ही इमारत बांधली आहे. ती अनधिकृत असल्याचे घोषित करून न्यायालयाने तोडण्याचे आदेश दिले होते.याबाबत फसवणूक झालेल्या रहिवाशांनी कन्हैयालाल याच्या कार्यालयात जाऊ न पैसे परत देण्याची मागणी केली. याचदरम्यान, घराचे हप्ते न भरल्याने सैद यांना बँकेकडून नोटीस आली.ती नोटीस कन्हैयालालकडे घेऊन गेलेल्या सैद यांना त्याने तुमचे पैसे परत करू शकत नसल्याचे सांगत काय करायचे, ते करा. पोलिसांत गेलात तर एकेकाला बघून घेईन, अशी धमकी दिल्याचे सैद यांनी मानपाडा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आतापर्यंत फसवणूक झालेले आठ जण पुढे आले आहेत.
इमारत बांधकामात लोकांची फसवणूक, बांधकाम व्यावसायिकांसह साथीदारांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 4:16 AM