परवानगीशिवाय कोविड हॉस्पिटल चालवत असल्याचा ठपका
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : वांगणीतील एक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना अवघ्या दोन दिवसांत बरे करत असल्याचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या डॉक्टरने वांगणीमध्ये कोणतीही परवानगी न घेता कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केले होते. त्यामुळे त्याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वांगणीतील डॉ. उमाशंकर गुप्ता गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर होमिओपॅथी पद्धतीने उपचार करत होता. याबाबत त्याने दोन दिवसांत रुग्ण बरे केल्याचे दावे करणारे काही व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केले होते. या व्हिडीओची दखल घेत अंबरनाथचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बनसोडे यांनी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुप्ता यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परवानगीशिवाय कोरोना रुग्णांवर उपचार करणे, तसेच मास्क घालायला मज्जाव करणे, असे गुन्हे त्याच्यावर दाखल केले आहेत.
गुप्ता हे वांगणीमध्ये एका दहा बाय वीसच्या खोलीत कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांच्या उपचारांमुळे अनेकांचे जीव वाचल्याचा दावा होत असल्याने राज्यातून आणि परराज्यांतूनही रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत होते. मात्र, कोरोना रुग्णांवर उपचार करताना जिल्हा शल्यचिकित्सकांकडून योग्य ती परवानगी घेणे गरजेचे होते, मात्र गुप्ता यांनी कोणतीही परवानगी न घेता उपचार करत होते. गुप्ता हे दोन दिवसांत बरे करीत असल्याचा दावा अनेक जण करत असले, तरी त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी मात्र कोणीही पुढे येत नव्हते.