अंबरनाथ : दीड वर्षापूर्वी विवाहबद्ध झालेल्या कंजारभाट समाजातील एका दाम्पत्याने समाजातील जाचक रूढींना विरोध केल्याने अंबरनाथमधील त्यांच्या समाजबांधवांनी त्यांच्यावर बहिष्कार घातल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी विवेक तमायचिकर यांच्या तक्रारीवरून कंजारभाट समाजातील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तमायचिकर यांच्या आजीचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्ययात्रेत समाजबांधवांनी न जाण्याचे आवाहन करणाºया एका व्हिडीओ क्लिपच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंबरनाथ, वांद्रापाडा परिसरातील भाटवाडी परिसरात कंजारभाट समाजाची मोठी वस्ती आहे. हा समाज आजही आपल्या समाजातील रूढी-परंपरा जपत आहे. मात्र, या समाजातील कौमार्यचाचणी प्रथेला विवेक तमायचिकर यांनी विरोध दर्शविला होता. पुण्यातील आपल्या पत्नीच्या कौमार्यचाचणीला त्यांनी विरोध केल्याने हे प्रकरण चांगलेच गाजले होते. दीड वर्षापूर्वी हा प्रकार घडला होता. काळाच्या ओघात हे प्रकरण शांत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, विवेक यांच्याविरोधात समाजाचा संताप अद्याप कायम असल्याचे दिसत आहे. विवेक यांच्या आजीचे सोमवारी रात्री निधनझाले. त्या वेळी भाटवाडी परिसरात एका कुटुंबात हळदीचा समारंभसुरू होता. विवेक यांनी समाजाच्या परंपरेला विरोध केल्याने आणि समाजाची मोठ्या प्रमाणातबदनामी केल्याने त्यांच्या आजीच्या अंत्ययात्रेत न जाण्याचे आवाहन या समारंभात समाजाचे सरपंचसंगम गारुंगे यांनी समाजातील लोकांना संबोधित करताना केले होते. त्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने विवेक यांनी या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री तक्रार केली होती. त्यानुसार, पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात समाजाचे सरपंच संगम गारुंगे, भूषण गारुंगे, करण गारुंगे, अविनाश गागडे यांचा समावेश आहे.आम्ही आमच्या भूमिकेवर ठामयासंदर्भात विवेक तमायचिकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कौमार्यचाचणीला याआधीच आपण विरोध केला आहे. आमच्या समाजातील या प्रथेला विरोध करणारी मंडळी आता पुढे येत आहेत. तरुणदेखील त्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, समाजातील काही मंडळी त्यांच्याविरोधात काम करत आहेत. त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालत आहेत. आज कंजारभाट समाज केवळ समाजाचा कायदा मानत आहे. शासनाच्या कायद्याकडे दुर्लक्ष करत आहे. आम्ही समाजातील स्त्रीशक्तीचा आदर करण्यासाठी या कौमार्यचाचणीला विरोध करीत आहोत. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. समाजातील काही लोक आमच्याविरोधात असले, तरी भविष्यात हा लढा यशस्वी होईल, असा आमचा विश्वास आहे.
सामाजिक बहिष्कार घालणाऱ्या सरपंचासह चौघांविरुद्ध गुन्हा; आजीच्या अंत्ययात्रेवरही समाजाने टाकला बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 1:56 AM