लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई तसेच ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असलेला कथित पत्रकार बिनू वर्गीस याच्याविरुद्ध आता कापूरबावडी पोलीस ठाण्यातही आणखी एक खंडणीचा गुन्हा बुधवारी रात्री दाखल झाला आहे. ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याकडूनच त्याने तीन लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप या तक्रारीमध्ये आहे.बिनू तसेच कथित महिला पत्रकार नाझीया सय्यद आणि उपायुक्तांविरुद्ध विनयभांची तक्रार करणारी अन्य एक महिला यांनी संगनमताने ठाण्यातील बाळकूम येथील ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात १५ मे २०२१ ते १ जून २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार केला. उपायुक्त केळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ‘या रुग्णालयाच्या एका परिचारिकेचा लैंगिक छळ केळकर यांच्याकडून सुरु असल्याचा मजकूर एका व्हॉटसअॅप ग्रृपवर टाकण्यात आला. तसेच त्याच रुग्णालयातील अन्य एका महिला कर्मचाºया सोबतचे फोटो व्हॉटसअॅपसह सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आले. याव्यतिरिक्त अन्यही महिला कर्मचाऱ्यांचीही बदनामी करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडे पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. त्यातील तीन लाख रुपये हे १ जून २०२१ रोजी ठाण्यातील बाळकूम येथील ग्लोबल रुग्णालयात केळकर यांच्या कॅबिनमध्येच घेतल्याचा आरोप आहे. परंतू, यामध्ये पूर्ण पाच लाखांची रक्कम नसल्यामुळे त्यावेळी बिनूने त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. याच तीन लाखांमधील एक लाखांची रक्कम उपायुक्तांवर विनयभंगाची तक्रार दाखल करणाºया महिलेला दिले. तर उर्वरित एक लाख रुपये कथित महिला पत्रकार नाझिया हिला दिल्याचे बिनूने सांगितले. मुळात, विनयभंगाची तक्रारही बनावट असून उलट बदनामी करण्याची भीती दाखवून आपल्याकडून तीन लाखांची खंडणी उकळल्याची तक्रार आता उपायुक्त केळकर यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कथित पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता असलेल्या बिनूविरुद्ध खंडणीचा अवघ्या एकाच आठवडयात ठाणेनगर पाठोपाठ हा दुसरा गुन्हा आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.