लोकमत न्यूज नेटवर्कसफाळे : पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायलॉन मांजा विकणाऱ्या दोन दुकानदारांवर सफाळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. नायलॉन मांजामुळे पक्षी जायबंदी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. नागपूर येथे १३ जानेवारीला मोटारसायकलवरून जाणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाच्या गळ्याला नायलॉनच्या मांजाचा विळखा बसून त्याचा गळा चिरून जागीच मृत्यू झाला होता. त्याची दखल उच्च न्यायालयाने घेतल्याने पोलीस यंत्रणा ही सतर्क झाली होती. सफाळे बाजारपेठेत जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश असतानाही दुकानात बेकायदा मांजा विक्री करत असल्याची माहिती कॉन्स्टेबल राजेंद्र घुगे आणि कैलास शेळके यांना कळाल्यानंतर सहायक पाेलीस निरीक्षक कहाळे यांनी छापा मारला.
बाजारपेठेतील गायत्री स्टोअर व जनता स्टोअर या दोन दुकानांमध्ये नायलॉन मांजा व फिरकी असा एकूण २२७० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या आदेशांचे पालन न केल्याचा ठपका ठेवून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोन्ही दुकानदारांवर सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नायलाॅनच्या मांजामुळे राज्यभरात अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यामध्ये नायलाॅनचा मांजा विक्री करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जारी केलेला आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी दुकानदारांकडून या आदेशाचे उल्लंघन करून या मांजाचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे नजरेस पडत आहे.