मीरा रोड : मीरा-भार्इंदरमधील ७२ बेकायदा नळजोडण्यांची यादी तयार होऊन दोन महिने झाले तरी पाणीचोरांना अभय मिळत होते. हे कृत्य करणारे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याविरोधात महापौर गीता जैन यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यामुळे पालिकेने पाणीचोरांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १६ जणांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीत २०११ पासून नवीन नळजोडण्या बंद असताना दुसरीकडे नवीन झोपड्या, चाळी, बांधकामे, इमारती मात्र मोठ्या प्रमाणात उभ्या राहत आहेत. नवीन नळजोडण्या देणे बंद असताना या नव्या बांधकामांना पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदा नळजोडण्या घेतल्या जातात. त्याचे दरही लाखांच्या घरात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजपा आ. संजय केळकर यांच्या बेकायदा नळ जोडण्यांच्या प्रश्नावर आश्वासन देताना सरकारनेही बेकायदा नळजोडण्या शोधून कायदेशीर कारवाईचे आदेश दिले होते. पण, पालिका प्रशासन मात्र ढिम्म आहे. याबाबत ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये सातत्याने बातम्या प्रसिद्ध झाल्या. २७ नोव्हेंबर २०१५ रोजी आयुक्त अच्युत हांगे यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांना लेखी आदेश देत शहरातील बेकायदा नळजोडण्या शोधून काढा, कारवाई करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. वाकोडे यांनी पालिकेचे ३१ मीटरवाचक व ५ मेस्त्री यांना ३० डिसेंबर २०१५ पर्यंत सर्वेक्षण करून प्रत्येक मालमत्तेनुसार असलेल्या नळजोडण्यांची यादी सादर करण्यास सांगितले होते. प्रत्येक मेस्त्रीच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके तयार केली होती. अहवाल सादर न केल्याने वाकोडे यांना प्रशासनाने दोन नोटिसा बजावल्या. अखेर, मेमध्ये पथकांनुसार बेकायदा नळजोडण्यांचा अहवाल सादर केला. शहरात केवळ ७२ बेकायदा नळजोडण्या सापडल्याने या अहवालाबाबतच संशय निर्माण झाला आहे. मे महिन्यात ७२ बेकायदा नळजोडण्यांची यादी आल्यानंतरही वाकोडे यांनी पाणीचोरांना पाठीशी घातले. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास टोलवाटोलवी केली. इतकेच नव्हे तरअनेक वर्षे चोरीचे व तेही फुकटात पाणी वापरणाऱ्यांकडून दंडही वसूल केला नाही. शिवाय, त्यात्या भागातील जबाबदार कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कुठलीच कारवाई केलेली नाही. पाणीचोरीची गंभीर दखल घेऊन जोपर्यंत गुन्हे दाखल करत नाही, तोपर्यंत दालनातच बसून राहणार, अशी आक्रमक भूमिका मंगळवारी महापौर गीता जैन यांनी घेतली. यामुळे वाकोडे यांची चांगलीच पंचाईत झाली. पाणीचोरांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांकडे लेखी तक्रार केल्याचे पत्र दाखवल्यानंतर मंगळवारी सायंकाळी महापौरांनी दालन सोडले.
पाणीचोरांवर गुन्हे
By admin | Published: July 16, 2016 1:43 AM