भिवंडी : खांबाळा ग्रामपंचायत क्षेत्रातील कुशिवली कातकरी पाडा येथील आदिवासी कुटुंबीयांनी खासगी व्यक्तीकडून केल्या जाणाऱ्या वाढीव पाणीपट्टी वसुलीस विरोध केल्याने आदिवासी पाड्यातील नागरिकांचा व परिसरातील पाणीपुरवठा बंद केल्याने संबंधितांवर सोमवारी रात्री पडघा पोलिसांनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.खांबाळा ग्रामपंचायत हद्दीतील नळपाणीपुरवठा योजनेसाठी तानसा पाइपलाइनवरून नळजोडणी करण्यात आली आहे. या पाणीवापराची पाणीपट्टी ग्रामपंचायत खात्यातून भरणे अभिप्रेत असताना गावातील गावदेवी पाणी कमिटीच्या महिलांकडून मासिक शंभर रुपये प्रत्येक घरातून वसूल करून ती पाणीपट्टी परस्पर मुंबई महापालिकेस भरली जात असे. लॉकडाऊन काळात पाणीपट्टी थकल्याने मुंबई महापालिका प्रशासनानें पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस खंबाळा ग्रामपंचायतीस दिली असता गावातील गावदेवी पाणी कमिटीच्या सदस्य महिलांनी गावातून अतिरिक्त पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. आदिवासी कातकरी कुटुंबीयांच्या प्रत्येक घरातून ५०० रुपये अधिक जमा करण्याबाबत तगादा लावला असता आदिवासी कुटुंबीयांनी नकार दिला. त्यामुळे या वस्तीचे पाणी तीन दिवस बंद ठेवण्यात आले. याबाबत शुभांगी विश्वास बगले यांनी आम्ही दरमहा मासिक पाणीपट्टी देत असतानाही पाणीपुरवठा खंडित केल्याची तक्रार दिली. पडघा पोलिसांनी गावदेवी पाणी कमिटीच्या महिला जयश्री गजानन ठाकरे, जयश्री पाटील, आशा विठ्ठल मांजे, सविता मांजे, चिऊ पाटील या महिलांविरोधात अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ नुसार ३ (१) नुसार गुन्हा दाखल केला आहे.करभरणा नाहीअंबाडी परिसरात ग्रामपंचायतमार्फत पाणीपट्टी वसूल न करता स्थानिक महिला मंडळ दरमहा रक्कम वसूल करून ती मुंबई महापालिकेकडे पाणीबिलापोटी भरणा करते. काही खासगी व्यक्ती वसुली करूनही मुंबई पालिकेची पाणीपट्टी थकीत ठेवत असल्याने आदिवासी वस्त्यांना पाणी न मिळण्याची वेळ आली.
भिवंडीतील आदिवासी वस्तीचे पाणी बंद करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 2:09 AM