ठाणे : कोणतेही धागेदोरे नसताना, पडघानजीकच्या सापेगाव येथील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, त्याची हत्या करणाऱ्या दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. मयत तरुणाचे हत्येतील अटक केलेल्या आरोपीच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. त्यातूनही ही हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
पडघा सापेगावचे हद्दीत ७ जुलै रोजी सुप्रीम कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. अज्ञात मारेकऱ्यांनी धारधार शस्त्राने गळा कापून, त्याची हत्या करून, रस्त्याच्या कडेला चारीमध्ये मृतेदह ढकलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबाबत पडघा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा तपास लावण्यास सुरुवात केली. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मयत याचे प्रेत कुजलेले असतानाही गुप्त बातमीदारामार्फत त्याची ओळख पटवली. त्यानुसार, मयत हा उल्हासनगर नं. ५ येथे राहणारा दिलीपकुमार रामचंद्र पाल (२२) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत हिललाइन पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रारही दाखल असल्याचे दिसून आले.
मात्र, या हत्येमागे नेमके कारण काय असेल किंवा या प्रकरणाचा कोणताही पुरावा नसताना, ग्रामीण पोलिसांनी आरोपींचा शोध लावला. त्यानुसार, विजय मूलचंद प्रजापती (२४) उल्हासनगर नं. १ आणि अंकित अमृतलाल परमार (४६) डोंबिवली पूर्व यांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार, मयत दिलीपकुमार याचे आरोपी विजय प्रजापती याच्या बहिणीबरोबर प्रेमसंबध होते. त्याचा राग मनात धरून, त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने ही हत्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार, आरोपींना पुढील तपासासाठी पडघा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीणचे सुरेश मनोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, हवालदार प्रकाश साईल आदींसह इतर पथकाने उघडकीस आणला.