लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील दोन वेगवेगळया हुक्का पार्लरवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने धाडसत्र राबविले. तर अंमली पदार्थ विरोधी पथकानेही शनिवारी रात्री छापा टाकला. या संपूर्ण कारवाईमध्ये ४९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून एकीकडे रात्रीची संचारबंदी लागू केलेली असतांना ठाणे आणि भिवंडीमध्ये काही ठिकाणी हुक्का पार्लरमध्ये तरुण तरुणी नशा करीत असल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या आदेशाने युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव आणि संदीप चव्हाण तसेच राबोडी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करुन २६ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास राबोडीतील ‘फिल्टर रेस्टॉरंट व हुक्का पार्लर’याठिकाणी कारवाई केली. या पार्लरचे कर्मचारी आणि काही ग्राहक अशा १४ जणांविरुद्ध ‘कोप्ता’ अंतर्गत या पथकाने कारवाई केली.दुसऱ्या घटनेमध्ये कापूरबारवडी भागातील लोढा कॉम्पलेक्सजवळील सेवा रस्त्यावरील ‘३६० हुक्का पार्लर’ याठिकाणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या पथकाने शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. याठिकाणी बेकायदेशीरपणे लपून छपून सुरु असलेल्या हुक्का पार्लरमधील ग्राहक, मालक आणि कामगार अशा २९ जणांविरुद्ध सिगरेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम चे कलम ५/२१, प्रमाणे कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.तर अंमली पदार्थ विरोधी पथकानेही २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारासभिवंडीतील ‘मूनलाईट धाबा’ याठिकाणच्या हुक्का पार्लरवर कारवाई केली. या कारवाईत तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाºया सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. जागा उपलब्ध करुन देणारे ढाबा चालक रोशन मलिक (२०) यांच्याविरुद्ध तंबाखूजन्य हुक्का सेवनाचा पदार्थ पुरवल्याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याठिकाणी हुक्का सेवनाची २५ हजारांची सामुग्री जप्त केली आहे. यामध्येही २९ जणांविरुद्ध कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील विविध ठिकाणच्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचे छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 4:41 PM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील दोन वेगवेगळया हुक्का पार्लरवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक तसेच अनैतिक मानवी वाहतूक ...
ठळक मुद्दे ४९ जणांविरुद्ध कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाची भिवंडीत कारवाई