मुंब्रा : ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितींतर्गत येणाऱ्या मुख्य रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कारवाई सुरू आहे. याअंतर्गत रविवारीही कारवाई केली होती. या कारवाईनंतर काही फेरीवाल्यांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन करून अतिक्रमणविरोधी पथकाने जप्त केलेल्या वस्तू परत करण्याची गळ घातली होती. आंदोलनानंतर एका फेरीवाल्याने यापुढे कारवाईसाठी येणाऱ्यांच्या पोटात कैची खुपसण्याची धमकी दिली होती. तिची दखल घेऊन लिपिक सुनील डोंगरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हपी सिंग, फिरोज खान, शेहबाज शेख यांच्यासह १४ जणांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच इतर गुन्हे दाखल केले आहेत.
फेरीवाल्यांच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता नागरिकांच्या हितासाठी तसेच मुख्य रस्ता फेरीवालामुक्त व्हावा, यासाठी यापुढेही फेरीवाल्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सागर साळुंखे यांनी ‘लोकमत’ला दिली.