लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरात विनापरवाना कुठेही पोस्टर्सबाजी करून शहाराचा चेहरा विद्रूप करू नका, असे आवाहन महापौर लीलाबाई अशान यांनी केले असून जे नागरिक पोस्टर्सबाजी करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले.
शहरातील गोलमैदान, नेहरू चौक, १७ सेक्शन, नेताजी चौक, छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूल, महापालिका मुख्यालय परिसर, उल्हासनगर, विठ्ठलवाडी व शहाड रेल्वे स्टेशन परिसर, शिवाजी चौक, जुना बस स्टॉप, हिराघाट, शहरातील मुख्य चौक आदी परिसरात विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, समाजसेवक यांनी विनापरवाना पोस्टर्स लावले आहेत. यामुळे शहराचा चेहरा विद्रूप झाल्याचे अशान यांच्या लक्षात आल्याने त्यांनी कारवाईचे आदेश दिले. आता महापालिका कुणाकुणावर कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या आठवड्यात महापालिका विशेष समिती सभापतीपदाच्या निवडणुका झाल्या. भाजप-ओमी टीमने नऊपैकी सात समिती सभापतीपदे मिळवली, तर शिवसेना व रिपाइं गटातील पीआरपी पक्षाला प्रत्येकी एक अशी दोन समिती सभापतीपदे मिळाली. भाजप व ओमी टीमने निवडून आलेल्या विशेष समिती सभापतींच्या अभिनंदनाची पोस्टर्स सर्वत्र लावली. भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करणारी पोस्टर्स अनेक ठिकाणी झळकली आहेत. एका वर्षावर महापालिका निवडणूक येऊन ठेपल्याने, राजकीय पक्षांच्या लहान-मोठ्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर्स लागली आहेत. त्यामुळे आता महापौरांच्या आदेशावरून कुणाकुणावर कारवाईचा बडगा उगारला जातो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
.........
वाचली