ठाणे : येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात तीन वर्षांपूर्वी दोन मनोरुग्णांमध्ये झालेल्या हाणामारीत अच्युत गांगण याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शवविच्छेदनाचा न्यायवैद्यक अहवाल प्राप्त झाल्यानंतर वागळे इस्टेट पोलिसांनी त्याचा मारेकरी अमोल कदम (३६) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर उपचार सुरू असल्यामुळे सध्या त्याला अटक केलेली नाही.मनोरुग्णालयातील वॉर्ड क्र. ८ मध्ये उपचार घेत असलेला अमोल आणि अच्युत यांच्यात २ एप्रिल २०१३ रोजी सकाळी हाणामारी झाली. या धुमश्चक्रीत अच्युतने अमोल याला गुडघ्याने डोळ्यावर मारहाण केली. यात अच्युत खाली कोसळल्याने त्याच्या डोक्याला मार लागून अंतर्गत रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. त्या वेळी मुंबईच्या सर जे.जे. रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा व्हिसेरा रिपोर्ट राखीव ठेवला होता. हा अहवाल १० आॅक्टोबरला ठाणे पोलिसांना जे.जे. रुग्णालय प्रशासनाने दिला. त्यानुसार, अमोलविरुद्ध २६ आॅक्टोबरला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक एस.एन. वाघ अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
हाणामारीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
By admin | Published: October 28, 2016 3:32 AM