मीरारोड - ठाणे जिल्ह्यातील भाईंदरच्या लॉज मधून मेफेड्रोन अमली पदार्थाच्या २५ लाखांच्या साठ्यासह चौघांना १८ ऑक्टोबर रोजी अटक केल्या नंतर मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ च्या पथकाने तपासाच्या आधारे पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे अमली पदार्थ बनवण्याची प्रयोगशाळाच शोधून काढली . पोलिसांनी आता पर्यंत या गुन्ह्यात एकूण ७ जणांना अटक केली असून ३६ कोटी ९० लाखांच्या एमडी सह वाहने, पिस्तूल , काडतुसे आदी जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली . पोलीस आयुक्तालयातली आता पर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थ विरोधातील कारवाई असून पालघर जिल्ह्यातून उघडकीस आलेला पहिला अमली पदार्थ बनवणारा कारखाना आहे .
मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा १ चे निरीक्षक अविराज कुराडे , सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे , कैलास टोकले व पुष्पराज सुर्वे सह संजय शिंदे , राजू तांबे , संदीप शिंदे , संतोष लांडगे , पुष्पेंद्र थापा , विजय गायकवाड , सचिन सावंत , सचिन हुले , समीर यादव , प्रशांत विसपुते यांच्या पथकाने बुधवार १८ ऑक्टोबर रोजी भाईंदर पूर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावरच्या विन्यासा रेसिडेन्सी लॉज मध्ये छापा टाकला होता . प्रशांत गांगुर्डे यांच्या माहिती वरून टाकलेल्या धाडीत एका खोलीतून सनी भरत सालेकर ( २८ ) बोरिवली पश्चिम ; विशाल सतीश गोडसे ( २८ ) कळंबोली ; शहाबाज शेवा ई ( २९) व दीपक जितेंद्र दुबे ( २६ ) दोघेही दहिसर ह्या चौघांना अटक केली होती .
त्यांच्या कडून २५ लाख १७ हजार किमतीचे मेफेड्रोन सह रोख , पिस्तूल , जिवंत काडतूस, मोबाईल , वाहने असा एकूण २६ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता . सदर एमडी तन्वीर निसार अहमद चौधरी ( ३३ ) रा . न्यू लवलेश एन्क्लेव्ह , गोल्डन नेस्ट, भाईंदर याच्या कडून विक्री साठी घेतल्याचे तर चौधरी याच्या चौकशीत गौतम गुनाधर घोष ( ३३ ) रा . आनंद एन्क्लेव्ह , आरबीके ग्लोबल शाळे जवळ , इंद्रलोक फेस ६ , भाईंदर पूर्वह्याने एमडी पुरवल्याचे समोर आले . पोलिसांनी दोघांना २१ ऑक्टोबर रोजी अटक केली .
घोष कडे कसून विचारणा केल्यावर त्याने समीर चंद्रशेखर पिंजार ( ४५ ) रा . नादब्रह्म, भास्कर आळी , वसई याचे नाव सांगितले . पोलिसांनी समीर ह्याला ताब्यात घेतले असता त्याने तर अमली पदार्थ बनवण्याची प्रयोगशाळाच उभारल्याचे उघडकीस आले . पालघरच्या मोखाडा येथील समीरच्या फार्महाउस वर धाड टाकून तेथील प्रयोगशाळा उध्वस्त केली . सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असलेला समीर हा फार्महाउस वर रासायनिक द्रव्य व पावडर वर प्रक्रिया करून एमडी बनवून घोष याच्या मार्फत विक्री करत होता . गेल्या दिड वर्षां पासून तो हा कारखाना चालवत होता . पोलिसांनी तेथून १८ किलो १०० ग्रॅम एम.डी. तसेच एम.डी. तयार करण्यासाठी लागणारे रसायन व उपकरणे जप्त केली आहेत.
पोलिसांनी ह्या कारवाईत आता पर्यंत ३६ कोटी ९० लाख ७४ हजारांचे १८ किलो ४५३ ग्रॅम मेफेड्रोन ; २ लाख ७४ हजारांचे मॅफेड्रॉन बनवण्यासाठीचे रसायन ; २ लाख ६० हजारांची यंत्र सामुग्री ; ७ लाख ८० हजारांची गुन्ह्यात वापरलेली वाहने ; २ गावठी पिस्टल, ४ मॅगझिन व १४ जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त केला आहे. घोष वर १ गुन्हा दाखल असून त्याचा इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय आहे . सनी सालेकर हा कुख्यात गुंड असून दहिसर - बोरिवली भागात त्याच्यावर १८ गुन्हे ; विशाल गोडसे वर ४ ; दीपक दुबे वर ९ ; शहाबाज वर ३ गुन्हे दाखल असल्याचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले . गुन्ह्याचा पुढील तपास प्रशांत गांगुर्डे करत आहेत .