भिवंडी - सहावर्षीय चिमुरडीची हत्या करून तिचा मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून आरोपी फरार झाल्याची घटना तालुक्यातील फेणेगाव धापसी पाडा परिसरातील चाळीत घडली. शुक्रवारी परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर घटना समोर आली. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे. भिवंडी शहर पोलिस ठाण्यात कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हत्या झालेल्या मुलीचे आई-वडील हे दोघेही गोदामामध्ये काम करण्यासाठी जातात. १३ सप्टेंबरला आई-वडील कामासाठी घरातून निघून गेले होते. त्यावेळी सहावर्षीय मुलीसोबत तिचा नऊ वर्षांचा भाऊ घरी होता. सायंकाळी आई-वडील घरी आल्यानंतर मुलाने बहीण दिसत नसल्याची माहिती आई-वडिलांना दिली. त्यानंतर आई-वडिलांनी परिसरात शोध घेत रात्री उशिरा भिवंडी शहर पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची नोंद केली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. जवळच्या वऱ्हाळा तलावामध्येही पोलिसांनी सर्च ऑपरेशन केले, मात्र मुलीचा शोध लागला नव्हता.
शुक्रवारी दुपारी परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतन काकडे व पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात शोध घेतला असता चाळीतील बंद असलेल्या खोलीमध्ये प्लास्टिकच्या बकेटमध्ये मुलीचा मृतदेह कोंबून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात रवाना केला आहे.