- जितेंद्र कालेकरठाणे - मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या नितू सिंगवी या ४९ वर्षीय महिलेने हिरानंदानी इस्टेट येथील तिच्या बाराव्या मजल्यावरील सदनिकेतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी दिली.
हिरानंदानी इस्टेट येथील ‘अस्त्र’ सोसायटीत ही महिला गेल्या दोन दशकांपासून वास्तव्याला होती. तिच्यावर मानसिक आजारावर उपचार सुरू होते. त्यात बहुतेक वेळा घरात ती एकटीच वास्तव्य करायची. काही कारणांमुळे तिचा पती, मुलगी आणि मुलगा घरापासून दूर वास्तव्याला होते. मुलगा पुण्यात असून पती भावनगरला तर २७ वर्षीय मुलगी कांदिवलीत नोकरीला असून तिथेच वास्तव्याला आहे. कांदिवलीमध्ये राहणारी तिची मुलगी दोन दिवसांपूर्वी सुट्टीसाठी घरी आली होती. नाश्त्यावरून दोघींमध्ये वाद झाला. त्यानंतर ही महिला बाल्कनीत गेली आणि तिच्या मुलीला जीभ दाखवून ती तिची छेड काढत होती. मुलीने तिच्याकडे दुर्लक्ष केले. पण त्याच क्षणी ‘देख देख’ असे म्हणत बाल्कनीतून तिने स्वत:ला झोकून दिले. तिच्या बाराव्या मजल्यावरील फ्लॅटवर ती बसली होती.
तिला आत्महत्या करायची होती की तिच्या मुलीची चेष्टा करताना पडून ती खाली पडली याचा तपास सुरू असल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले. मुलीवरही काही मानसिक उपचार सुरू असल्याचे शेजाºयांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून आमचा तपास आणि कुटुंबीयांचे जबाब अद्याप सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी दिली.