जितेंद्र कालेकर
ठाणे: ड्रंक ड्राईव्ह प्रकरणी वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्याच्या रागातून अनिल गुप्ता (38) या मद्यपीने कापूरबावडी वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार नागनाथ कांदे यांच्या डोक्यावर वीटेने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कांदे यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सूत्रंनी दिली.
होळी आणि धुलीवंदननिमित्त ठाणे शहर वाहतूक पोलिसांकडून मद्यपी वाहन चालकांविरुद्ध शुक्रवारी दिवसभर कारवाईची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईच्या वेळी भागिरथ चव्हाण या मद्यपी मोटारसायकलस्वारावर कांदे यांच्या पथकाने कलम 185 नुसार कारवाई केली. तर सह प्रवासी असलेल्या अनिल गुप्ता याच्याविरुद्ध कलम 188 नुसार शुक्रवारी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. पोलिसांच्या तपासणीत दोघांनीही मद्य प्राशन केल्याचे आढळले. दोघांनाही शनिवारी ठाणे न्यायालयात हजर राहण्यास पोलिसांनी बजावले. याच कारवाईचा राग आल्याने गुप्ता याने जवळच पडलेल्या वीटेने हवालदार कांदे यांच्यावर हल्ला केला. यात डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. याप्रकरणी गुप्ता आणि चव्हाण या दोघांविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणो आणि पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून वरिष्ठ पेालीस निरीक्षक संतोष घाटेकर हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.