ठाणे: ठाण्यातील वृंदावन या उच्चभ्रू सोसायटीमध्ये मांजराला अज्ञात व्यक्तीने मारल्याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे मांजरीचे शव जमिनीतून उकरून तिला झालेल्या मारहाणीचे अवलोकन करण्यासाठी ते भिवंडी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.वृंदावन सोसायटीमध्ये वास्तव्यास असलेले निलेश मालवीय हे परेल येथील एका नामांकित कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांची पत्नी पूनम या प्राणी प्रेमी असून त्या भटक्या प्राण्यांची आवर्जून काळजी घेतात. त्यांची मोठी मुलगी जिया (१४) हिला ते वास्तव्यास असलेल्या इमारत क्रमांक ८४ च्या बी विंगच्या आवारामध्ये एक बेवारस मांजर आढळले. त्यांनी काळजीपोटी तिला घरी आणले. सोमवारी सकाळी या मांजरीने तीन गोंडस पिल्लांना जन्म दिला. त्यानंतर या मांजराला कोणीतरी लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात जखमी अवस्थेमध्ये ती रक्ताच्या थारोळयामध्ये पडली. तिच्यावर या कुटूंबाने अंत्यसंस्कार करुन दफनविधीही केला. या प्रकरणाची माहिती मिळताच आणखी एक प्राणीप्रेमी राहुल कुडतरकर यांनी मालवीय कुटुंबाची भेट घेतली. तेंव्हा निलेश मालवीया यांनी याप्रकरणी कलम ४२९ अन्वये राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आता गुन्हा दाखल झाला असून मांजरीचा पुरलेला मृतदेह काढून तो शवविच्छेदनासाठी भिवंडीतील पशुवैद्यकीय रुगणालयात पाठविण्यात आला आहे. मारेकऱ्याचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी सांगितले.