उल्हासनगर : एका केबल व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी एका पोर्टल चॅनलच्या पत्रकारासह त्याच्या चौघा साथीदारांवर हिललाइन पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या महिन्यातही पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर असाच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उल्हासनगरातील केबलचालक व व्यावसायिक नरेश रोहिडा यांची तथाकथित तीन पत्रकारांनी दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन तू क्रिकेटचा बुकी असून गुटख्याचा धंदा करत असल्याचे सांगितले. आमच्या पत्रकार संघात दुबे आणि मिश्रा हे पत्रकार असून, संघासाठी ८० हजार रुपयांची मागणी त्यांनी रोहिडा यांना केली. या प्रकाराचे सीसी कॅमेऱ्याचे फुटेज सहायक पोलीस आयुक्तांकडे जमा केल्याचे रोहिडा यांनी सांगितले.
दरम्यान, दुबे याच्या बँक खात्यात आॅनलाइन पद्धतीने दोन हजार रुपये जमा केल्याचे व ती रक्कम संबंधिताने काढल्याचे बँक स्टेटमेंटसुद्धा पोलिसांना दिल्याचे रोहिडा यांनी तक्र ारीत नमूद केले आहे. त्यांच्या तक्रारीवरून हिललाइन पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने हे या प्रकरणाचा तपास करत असून, पत्रकार दुबे आणि त्याच्या तीन साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.