कल्याण : पूर्वेतील चक्कीनाका परिसरात मंगळवारी रात्री उशिरा शिवसेनेचे माजी नगरसेवक नवीन गवळी यांचा वाढदिवस साजरा झाल्यावर दोन गटांत हाणामारी आणि त्यात गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दाखल झालेल्या तक्रारीवरून २८ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी मध्यरात्री १२ वाजता त्यांच्या चक्कीनाका परिसरातील कार्यालयात शेकडो समर्थक जमले होते. वाढदिवस कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर मध्यरात्री २ ते ३.३० दरम्यान दोन गटांत तुंबळ हाणामारीचा प्रकार घडला होता. हाणामारीत फायटर, लोखंडी कोयते यांचा वापर करण्यात आला असून यात काही जण जखमी झाले आहेत. तसेच रिव्हॉल्व्हरमधून गोळीबारही करण्यात आला. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, याप्रकरणी देवा यादव आणि विजय चौहान यांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
-----------------------------
ऑनलाइन फसवणूक
डोंबिवली : कंपनीच्या ई-मेलवर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर असल्याचे भासवून वेंडरचे पेमेंट करावयाच्या बहाण्याने १६ जणांच्या बँक खात्यातून एकूण १३ लाख पाच हजार ३५३ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १ मार्चला हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात १६ जणांनी दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.
--------------
------------------------------------------------------