ठाणे : सोसायटीच्या आवारात बसलेल्या श्वानाच्या अंगावर गाडी घालून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला कारचालक गिरीश संत याच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचे चित्रण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तीन दिवसांनी प्राणिमित्र संघटनेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार, श्वानाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली कार पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतली आहे. संत याला नोटीस बजावून रविवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे, अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.नौपाडा परिसरातील निवारा पामस्प्रिंग सोसायटीमध्ये कारचालक गिरीश संत भाड्याने राहतो. २४ आॅक्टोबरला सोसायटीमधून कार काढताना ती सोसायटीच्या आवारात बसलेल्या श्वानाच्या अंगावर गेली. तशी गाडी जातअसल्याचे सोसायटीतील एका व्यक्तीने संत याच्या निदर्शनास आणले, तरीही त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याने तो कुत्रा मरण पावल्याचा प्राणिमित्रांचा दावा आहे.हा प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्हीत कैद झाला आणि त्याचे फुटेज व्हायरल झाले. ते पाहून अॅनिमल वेल्फेअर आॅफिसर संजीव दिघे यांनी २७ आॅक्टोबरला नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मोटार वाहन कायद्यासह प्राणी संरक्षण कायदा आणि प्राण्याला निष्ठुरपणे मारण्याचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी संत याची कार तपासणीसाठी ताब्यात घेतली असून त्याला नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर करीत आहेत.
श्वानाला चिरडल्याने कारचालकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 4:56 AM