सदानंद नाईक, उल्हासनगर : द्वारलीगाव येथील वादग्रस्त जमीन प्रकरणी विकासक समर्थक व शेतकऱ्यांत झालेल्या राडा प्रकरणी परस्पर विरोधी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. विकासक व महेश गायकवाड यांच्यासह १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल झाले असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
उल्हासनगर द्वारली गावातील वादग्रस्त जमीनीवरुन आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात ८ महिन्यांपूर्वी गोळीबार केला होता. सोमवारी विकासकाने समर्थकांच्या मदतीने द्वारली येथील वादग्रस्त जमिनीची मोजणी सुरू करताच शेतकरी व विकासक समर्थकात राडा झाला. यावेळी महेश गायकवाड हेही समर्थकासह आले होते. एका संशयित इसमाकडून गावठी कट्टासह चॉपर, चाकू असे घातक शस्त्र पोलिसांनी जप्त केले. या राडा प्रकरणी जितेंद्र रामअवतार पारीख यांच्या तक्रारीवरून महेश गायकवाड यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हे दाखल केले. तर सविता जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जितेंद्र पारीख यांच्यासह ६६ जणांवर गुन्हे दाखल केले.
द्वारलीगाव हद्दीतील जमीन वादावरून परस्पर तक्रारीवरून हिललाईन पोलिसांनी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल करून चौकशी सुरू केली. तसेच द्वारलीगाव येथील नागरिकांना शांततेचे आवाहन करून वादग्रस्त जमीन व गावात पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती हिललाईन पोलिसांनी दिली. याच वादग्रस्त जमिनीवरून पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. मात्र या वादग्रस्त जमिनीचा वाद संपतासंपत नसल्याने, आमदार गणपत गायकवाड व शिंदेंसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वाद विधानसभा निवडणुकीत धोकादायक वळणावर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.