ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामाविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेंतर्गत मंगळवारी वर्तकनगर प्रभाग समिती आणि दिवा प्रभाग समितीमधील सात अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून दोघांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले. ही कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली.
या कारवाई अंतर्गत वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील येऊर येथील स्वानंदबाबा आश्रम येथील फार्महाऊसमधील मोकळ्या जागेवर सुरू असलेले अंदाजे १००० चौ. फूट मोजमापाच्या नवीन बंगल्याच्या अनधिकृत बांधकामाच्या भिंती व जोत्याचे बांधकाम जेसीबी व मनुष्यबळ यांच्या साहाय्याने पूर्णतः निष्कासित केले. तर टिकुजिनीवाडी रिसॉर्टसमोरील विद्युतवाहिनी सब स्टेशनलगत असलेल्या मोकळ्या जागेमध्ये १०×२० चौ. फूट मोजमापाच्या अनिवासी गाळ्याचे अनधिकृत बांधकाम, बॉम्बे डक हॉटेल यांचे अंदाजे २०×२० चौ. फूट मोजमापाचे अंतर्गत वाढीव अनधिकृत बांधकाम आणि राममंदिराच्या बाजूला रोनाचापाडा येथील सुरू असलेले १५×३० चौ. फूट अधिक १५×२० चौ. फूट या मोजमापाचे नवीन बैठे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले.
तर दिवा समिती अंतर्गत वक्रतुंड नगर येथील वैभव मोहिते यांचे व साईनाथ नगर येथील राकेश शिंदे यांचे अनधिकृत आरसीसी बांधकाम व कॉलम गॅस कटरच्या साहाय्याने तोडण्यात आले.
या दोघांवर गुन्हे दाखल
दरम्यान, दिवा प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ३९७ (क) (१) ख, अन्वये राकेश राजाराम शिंदे आणि रवी गोविंद राडे यांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.