भिवंडी : तालुक्यातील कशेळी-काल्हेर परिसरातील इमारतींवर कारवाई करण्याकरिता गेलेल्या एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीबाबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्यासह २५ ते ३० जणांविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात शुक्रवारी बेदम मारहाण व सरकारी कामात अडथळा आणणे या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले. एमएमआरडीएचे विधि अधिकारी मिलिंद प्रधान व त्यांच्या सहकाऱ्यांना थळे व अन्य जमावाने पोलिसांच्या उपस्थितीत गुरुवारी मारहाण केली होती.
एमएमआरडीएच्या कारवाईच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. यावेळी थळे यांनी प्रधान व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. एमएमआरडीएच्या दोन कॅमेरामनलाही मारहाण करून त्यांच्या हातातील कॅमेरे हिसकावून घेत मारहाणीचे व कारवाईचे चित्रीकरण नष्ट केले. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक तुंबडा करीत आहेत.
काल्हेर व कशेळी या ग्रामपंचायत भागात मोठ्या प्रमाणावर निवासी इमारतींचे बांधकाम झाले असून, काही इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मे महिन्यापासून या ठिकाणी इमारतींवरील कारवाई सुरू असून, दोनशेहून अधिक इमारतींना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.
..........
वाचली