अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या हद्दीत येणाऱ्या पोलीस ठाण्यांत काही महिन्यांत गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊन लागल्यानंतर गुन्ह्यांचा आकडा खाली घसरला होता. आता लॉकडाऊन शिथिल होताच पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात गुन्हे वाढले असल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कडकडीत लॉकडाऊन असल्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील पोलीस ठाण्यात दिवसाला एखाद दुसराच गुन्हा दाखल होत होता. त्यातही कौटुंबिक वादाचे गुन्हे सर्वाधिक होते. हत्या, हत्येचा प्रयत्न, हाणामारी, चोरी, चेन स्नॅचिंग आणि घरफोडी अशा गुन्ह्यांच्या प्रमाणात ९० टक्के घट झाली होती. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक जण घरी असल्यामुळे आणि बाहेर पडण्यास बंदी असल्यामुळे गुन्ह्यांवर आळा बसला होता. त्यातच शहरात सर्व ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त असल्याने चोर सावध झाले होते. लॉकडाऊन संपताच आता चोरट्यांनी पुन्हा गुन्हे करण्यास सुरुवात केली आहे, तर गंभीर गुन्ह्यांपैकी हाणामारी आणि हत्येच्या घटनांतही वाढ झाली आहे. लॉकडाऊननंतर गुन्ह्यांचा वेग वाढल्याने पोलीसही चिंतेत आहेत.
वर्षभराचा विचार केला असता अंबरनाथ पाेलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांतील ८० टक्के गुन्हे हे लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दाखल झाले आहेत. तर लॉकडाऊनच्या काळात अवघे २० टक्केच गुन्हे दाखल झाले आहेत. निर्बंध शिथिल झाल्यानंतर गुन्हे चारपटीने वाढले आहेत. या गुन्ह्यांत हाणामारी, घरफोडी, चेन स्नॅचिंग यांचे सर्वाधिक प्रमाण आहे, तर लाॅकडाऊनच्या काळात कौटुंबिक वाद आणि परिसरातील नागरिकांत झालेली आपापसातील हाणामारी यांचे प्रमाण सर्वाधिक होते. या सर्व गुन्ह्यांसोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांतही वाढ झाली आहे.