ठाणे : संचारबंदीच्या कालावधीत अन्नधान्य वितरणात मनमानीपणे अफरातफर केल्यामुळे जिल्ह्यातील शहरी भागांमधील सहा शिधावाटप (रेशनिंग) दुकानांवर फौजदारी गुन्ह्यांसह परवाने निलंबनाची धडक कारवाई केल्याची माहिती फ परिमंडळचे उपनियंत्रक नरेश वंजारी यांनी सांगितले.शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य सुरळीत व नियमीत मिळावे, यासाठी फ परिमंडळ उपनियंत्रक विभागाने दक्षता घेऊन जिल्ह्यात १३ भरारी पथके तैनात केली. त्यांच्याद्वारे जिल्ह्यातील सुमारे एक हजार ४४१ रेशिनंग दुकानांवर लक्ष केंद्रीत करून त्यांच्या मनमानीला आळा घातला. त्यापैकी बेजबाबदारपणा, मनमानी व अन्नधान्य वितरणात अफरातफर, धान्याचे कमी वाटप, तर काही पात्र कार्डधारकांना अन्नधान्य न दिल्याच्या कारणाखाली सहा दुकानांवर ही धडक कारवाई केली आहे. यामध्ये अंबरनामधील सर्वाधिक तीन रेशनिंग दुकानांसह ठाणे येथील दोन, भार्इंदर येथील एका रेशिनंग दुकानाचा समावेश आहे.अशी केली ग्राहकांची फसवणूकठाण्याच्या घोडबंदरचे त्रिवेंद्र चंदे यांनी शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने अन्नधान्य वितरण केले आहे. तर, ठाणे (पूर्वच्या) ओमसाई स्वयंसहायता बचत गटाने रेशनिंग दुकान ठरवून दिलेल्या वेळेपर्यंत सुरू ठेवले नाही. भार्इंदरच्या अशोक गौड यांनी शिधापत्रिकाधारकांचे १२ क्विंटल गहू त्यांना वितरित केला नाही.ते स्वत:च्या फायद्यासाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले. अंबरनाथला बशीर व इस्माईल किडवईकर यांनी नियमानुसार वाटप करण्याऐवजी कमी अन्नधान्य वितरित केले आहे. तर, दामाजी गोसर यांनी चणाडाळीची मागणी करण्यास टाळाटाळ केल्यामुळे कार्डधारकांना ती मिळाली नाही. याप्रमाणेच सुनील सांगळे व जुगेशकुमार गुप्ता यांनी नियमानुसार वाटप करण्याऐवजी कमी अन्नधान्य वितरित केल्याची मनमानी केली, आदींवर भरारी पथकांच्या अहवालावरून कडक कारवाई केल्याचे वंजारी यांनी सांगितले.
जिल्ह्यात सहा रेशनिंग दुकानांवर फौजदारी कारवाई, परवानेही निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 12:46 AM